News Flash

पहिल्याच जोरदार पावसाचे पूर्व विदर्भात सहा बळी

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पूर्व विदर्भात तीन दिवसातच सहा जणांचा बळी घेतला आहे. या घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हा

| June 18, 2013 09:13 am

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पूर्व विदर्भात तीन दिवसातच सहा जणांचा बळी घेतला आहे. या घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासन कामाला भिडले आहे. अकोला, वाशीम आणि बुलढाण्यात शेकडो लोक बेघर झाले असून कच्च्या घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. जोरदार पाऊस, वादळ आणि वीज पडल्याने सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा तालुक्यातील आनंद कुटाळे याचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. मिर्झापूर तालुक्यातील हिरपूर खेडय़ातील अशाच एका दुर्घटनेत सुरेश राऊत आणि आयुष चारथळ (४) जखमी झाले. मोर्णा नदीला पूर आल्याने सुधाकर हातेकर आणि अरुण दामोदर हे दोघेजण वाहून गेले आहेत. सुकोडा खेडय़ात ही घटना घडली.
वाशीम जिल्ह्य़ातील मंग्रुळपीर तालुक्यातील माळीपुरा येथे एक सुरक्षा रक्षक रघुनाथ मांडवगडे पुराच्या पाण्याबरोबर वाहत गेला. घर कोसळल्याने रघुनाथ नाल्याच्या प्रवाहात सापडल्याचे सांगण्यात आले. बुलढाणा जिल्ह्य़ातील पिंपळगाव काळे उपकेंद्रातील शाखा अभियंता प्रल्हाद कलोडे याचा अंगावर कडूनिंबाचे झाड पडून मृत्यू झाला.
जळगाव जामोद-नांदुरा मार्गावरून दुचाकीने जात असताना त्याच्या अंगावर मोठा वृक्ष कोसळला. खामगाव तालुक्यातील गणेशपूर खेडय़ात परशराम लाथड (२५) हा तरुण नदीच्या प्रवाहात सापडल्याने वाहून गेला.
गेल्या दोन दिवसात अकोल्यात ५८.५ तर बुलढाण आणि वाशीम जिल्ह्य़ात अनुक्रमे ५३.२४ आणि १७०.६२ मिमि पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. महान खेडय़ातील काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी वाढली असून पाणलोट क्षेत्रातही दोन दिवसात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असून आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये उघडीप होती. सकाळी आणि दुपारी चांगले उन्हं पडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2013 9:13 am

Web Title: six dead in first rain in nagpur
टॅग : Dead,Maharashtra,Nagpur,News
Next Stories
1 पावसाळ्याच्या तोंडावर भाज्या कडाडल्या
2 झाडीपट्टी कलावंत लागला शेतीच्या कामाला
3 चंद्रपूर जिल्ह्य़ाचे १ ऑगस्टपासून ४ नवे उपविभाग
Just Now!
X