वार- शुक्रवार. वेळ – रात्रो ९ वाजता..
स्थळ – कल्याण लोकसभा मतदार संघ..
मुंब्रा बाह्य़वळणमार्गे डोंबिवलीत प्रवेश करण्यासाठी शीळफाटा येथे येताच निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर अधिक बटबटीतपणे उभे राहू लागले. जागोजागी रस्त्याच्या दुतर्फा उमेदवारांचे भलेमोठे फलक पाहावयास मिळत होते. काटई नाका, कोलेगाव, प्रीमियर कॉलनी, मानपाडा, लोढा हेरिटेज, सोनारपाडा, दावडी नाका, देसाईपाडा आदी भागांत रस्त्यावर उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कुठलेही फलक दिसत नव्हते. प्रचाराच्या या धुरळ्यातून रस्त्याच्या बाजूचा एकही विद्युत खांब उमेदवारांनी सोडलेला नाही. प्रत्येक खांबावर जाहिरातबाजी केली आहे.
 काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बांबूच्या आधारावर फलक उभारण्यात आले असून काही कोलमडून पडले आहेत. डोंबिवली शहरात शिरताच अशीच काहीशी अवस्था पाहावयास मिळते. या मतदारसंघाची फलकांमुळे बजबजपुरी झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, शहराचा चेहरा बदलण्याची भाषा राज ठाकरे नेहमीच त्यांच्या भाषणांमधून करीत असतात. मात्र येथे त्यांच्या पक्षाचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटीलच जागोजागी फलकबाजी करून मतदारसंघ विद्रूप करण्यात आघाडीवर असल्याचे दिसले. विद्युत खांब, रस्त्याच्या दुतर्फा सर्वच ठिकाणी प्रमोद पाटील यांचे फलक दिसून येतात. शहरातील चौकही त्यांनी सोडले नसून त्या ठिकाणी चारही बाजूस फलक लावण्याचा कहर केला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फलक दिसून येतात. श्रीकांत शिंदे यांचेही शिळफाटा ते डोंबिवली शहर असे सर्वत्र भलेमोठे फलक लागले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनीही मतदारसंघात फलकबाजी केली असली तरी शिवसेना-मनसेच्या तुलनेत त्यांचे प्रमाण कमी आहे. शिवसेना-मनसे उमेदवारांनी इतर उमेदवारांना फलक लावण्यासाठी जागाच शिल्लक ठेवलेली दिसून येत नाही. त्यामुळे कदाचित परांजपे या फलक युद्धात मागे राहिले असावेत, अशी चर्चा शहरात चवीने चर्चिली जात आहे. एकंदरीतच शहरातील फलकांमुळे शिवसेना-मनसे उमेदवारांमध्ये सध्या फलकयुद्ध सुरू असल्याचे दिसून येते. शीळफाटा आणि डोंबिवली शहराच्या तुलनेत कळवा-मुंब्रा शहरात फलकांचे प्रमाण तुरळक असून त्या ठिकाणी निवडणुकीचे फारसे वातावरण दिसून येत नाही. मात्र, या शहरात आनंद परांजपे यांचे फलक पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे, शिळफाटा येथील रस्त्यावरील बस स्थानकाला एका राजकीय पक्षाने मंडपाचे रूप देऊन त्या ठिकाणी कार्यालय थाटले आहे. तसेच डोंबिवली शहरात जागोजागी रस्ते अडवून राजकीय पक्षाचे भलेमोठे मंडप उभारण्यात आल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता राजकीय पक्षांकडून पायदळी तुडवली जात असल्याचे चित्र असतानाही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.