एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ होऊनही वेतनवाढ देण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ एसटी कामगारांच्या सहा प्रमुख संघटनांनी काळ्या टोप्या घालून निषेध नोंदविला असून राज्यभरातील एस.टी. कर्मचारी येत्या १ जुलैपासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या कराराची घोषणा करून दोन महिने उलटल्यानंतरही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. त्या विरोधात एस.टी.च्या सहा संघटनांनी मिळून कृती समिती स्थापन केली असून वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सहा संघटनांच्या नेत्यांनी मुंबई येथील सेंट्रल मुख्यालयात जाऊन काळ्या टोप्या घालून निषेध नोंदविला.
एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना १ जुलैपासून संपावर जात असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जुन्या कराराची १ एप्रिलची मुदत संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना दोनवेळा वेतन वाढ करण्याची घोषणा केली; परंतु त्या घोषणांवर अद्यापतरी अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे सुनील भुते यांनी यासाठी एस.टी. ची मान्यताप्राप्त संघटना जबाबदार असल्याचे सांगितले. संघटना करारवर सही करणार नसेल तर शासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या सह्य़ा त्यावर घ्याव्या की जेणेकरून कर्मचाऱ्यांना महागाईच्या दिवसात दिलासा मिळू शकेल, असेही भुते यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 10:47 am