परभणी महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने नेहमीप्रमाणेच तटस्थतेच्या नावाखाली राष्ट्रवादी सहकार्य केले. यावरून शिवसेना ही राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर असल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक सुनील देशमुख यांनी पत्रकाद्वारे केला.
शिवसेनेने राष्ट्रवादीशी शहर महापालिकेत हातमिळवणी असल्याचे वारंवार सिद्ध केले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत विजय जामकर विजयी झाल्यानंतर बी. रघुनाथ सभागृहात त्यांच्या आनंदोत्सवात शिवसेनेचे गटनेते व स्थायी समिती सदस्य त्यांचे अभिनंदन करताना दिसत होते. ते खरे तटस्थ असते तर त्यांना सभापती राष्ट्रवादीचा होवो किंवा काँग्रेसचा, त्यांना आनंद होण्याचे कारण नाही, असा टोला देशमुख यांनी निवेदनात लगावला आहे.
मनपाच्या पहिल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या एका सदस्याचा अर्ज दाखल केला होता. त्याला अनुमोदन राष्ट्रवादी सदस्याचे होते. मनपात शिवसेनेची भूमिका राष्ट्रवादीला नेहमी पोषक असते, असे सेनेने आजपर्यंत मनपाच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समिती बठकीमध्ये कुठल्याच मुद्यावर राष्ट्रवादीला विरोध न करता सिद्ध केले असल्याचेही देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे.
पाठिंबा न दिल्याने जळफळाट; शिवसेनेची काँग्रेसवर तोफ
मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला नाही म्हणून काँग्रेसचा जळफळाट झाल्याचे प्रत्युत्तर मनपातील शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे यांनी दिले.
काँग्रेस नगरसेवक सुनील देशमुख यांनी शुक्रवारी पत्रक काढून शिवसेना राष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर असल्याचा आरोप केला. या आरोपाचा सरोदे यांनी पत्रकानेच समाचार घेतला. स्थायी सभापती निवडणुकीत पक्षादेशाप्रमाणे सेनेचे सदस्य तटस्थ राहिले. काँग्रेसने सेनेकडे स्थायी सभापतिपदासाठी पाठिंब्याची मागणी केली होती. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष सेनाविरोधी असल्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. अशा स्थितीत शिवसेना सदस्य तटस्थ राहिल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला, तरी आम्हाला त्याचे काही देणे-घेणे नाही, अशी भूमिका मांडली.
विजय जामकर यांची सभापतिपदी निवड झाल्यानंतर सभागृहाबाहेर सर्व गटनेते थांबले होते. सभापतींचे सर्वानी स्वागत केले. यात गर काही नसल्याचे अप्रत्यक्षपणे सरोदे यांनी स्पष्ट करून सभागृहात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस योग्य भूमिका पार पाडते की नाही, हे सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. मात्र, सेना नेहमीच आक्रमक भूमिका घेते, याचा अनुभव काँग्रेस सदस्यांना आहे, असेही पत्रकात सरोदे यांनी म्हटले आहे.