जीवन सुरक्षा योजनेमुळे समाजातील गोरगरीब जनतेला लाभ होणार असल्यामुळे या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर अनिल सोले यांनी केले.
महापालिकेने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना लागू केली आहे. त्या अनुषंगाने जीवन सुरक्षा प्रकल्पातंर्गत इच्छुक लाभार्थीना अर्ज वाटपाचा शुभारंभ महापौर अनिल सोले यांच्या उपस्थित राजे रघुजीनगर भवनात करण्यात आला. यावेळी दोन कुटुंबांना या योजनेतंर्गत अर्जाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपमहापौर जैतुनबी अशफाक अंसारी, स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, बसपानेता मुरलीधर मेश्राम, शीतल घरत, सविता सांगोळे आदी उपस्थित होते.
जे नियमित कर भरतात आणि त्यांच्याकडे एखादी घटना घडली तर त्या कुटुंबीयांना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळणार आहे. यावर्षी पहिल्यांदा सात अर्ज आले त्यापैकी २ कुटुंबीयांची कागदपत्रे पूर्ण असल्यामुळे त्यांना आज अर्जाचे वाटप करण्यात आले. जीवनाला सुरक्षा या दृष्टीने या योजनेतंर्गत पात्र लाभार्थीना याची माहिती देऊन त्यांच्याकडून या योजनेचे अर्ज भरून घ्यावे, असे आवाहन सोले यांनी केले.
अविनाश ठाकरे म्हणाले, शहरात ४० टक्के जनता अशी आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे. ही जनता हातावर कमवते आणि उदरनिर्वाह करते, अशा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला भीषण आजार झाला तर त्या कुटुंबाला कर्ज काढावे लागते. अशा कुटुंबासाठी ही योजना आहे. महापालिका क्षेत्रातील ५ ते ६५ वर्षे वयोगटातील एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब, पती-पत्नी व दोन अपत्ये पात्र लाभार्थीचा विमा उतरविण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला काम देण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. यावेळी विविध बचतगटासह समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.