यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता इचलकरंजीतील प्रांत कार्यालयामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. गेले १५ दिवस ५० हजार कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून, सोमवारच्या बैठकीत तरी निर्णय लागणार का, याकडे लक्ष वेधले आहे. या बैठकीमध्ये मंत्री नियुक्त समिती, यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यंत्रमाग कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. दरमहा १० हजार रुपये वेतन मिळावे वा दररोज ४०० रुपये पगार मिळावा, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू होऊन दोन आठवडे झाले तरी निर्णय होऊ शकला नाही. यापूर्वी कामगारमंत्री मुश्रीफ यांच्यासमवेत झालेल्या दोन बैठका निर्णयाविना आटोपत्या घ्यावा लागल्या होत्या. त्यानंतरही प्रांताधिकारी तुषार ठोंबरे व कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे यांनीही यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींत समन्वय घडविण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये यश येऊ शकले नाही. उलट पुन्हा एकदा निर्णय घेण्यासाठी कामगारमंत्र्यांकडे बैठक घेण्याचे ठरले.    
    कोल्हापूर येथे कामगारमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे जाहीर केल्यानंतर कामगार कृती समितीच्या सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला. मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगारांसंदर्भात समिती नेमण्याचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर बैठकीवर बहिष्कार राहील, असे त्यांच्याकडून घोषित करण्यात आले. मुश्रीफ यांनी नमती भूमिका घेत इचलकरंजीमध्ये बैठकीला येण्याचे मान्य केले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी संयुक्त बैठक होणार आहे.     
    कामगार प्रतिनिधींनी १० हजार रुपये निश्चित वेतनाच्या मागणीमध्ये बदल केला आहे. मात्र १० हजार रुपये वेतन मिळेल इतकी मजुरीत वाढ केली पाहिजे अशी नवी मागणी त्यांच्याकडून होत आहे. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात मजुरीवाढ देण्यास यंत्रमागधारकांचा विरोध आहे. शिवाय यंत्रमागधारकांनी ८.३३ टक्के इतका बोनस देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडामोडी व बदल लक्षात घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे आव्हान कामगारमंत्री मुश्रीफ यांच्यासमोर उभे ठाकले आहे.