संवर्धनाबाबत प्राधिकरणाची भूमिकाही संशयास्पद
ठाणे शहरात बांधकाम विकासकांपाठोपाठ नव्याने उभे राहत असलेल्या मॉलसाठी बेकायदेशीररीत्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे काही प्रकार गेल्या काही वर्षांत घडले असून त्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महापालिका प्रशासनाने वृक्षांची कत्तल केल्याच्या बदल्यात नव्याने वृक्ष लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असले तरी वृक्षांची कत्तल करणाऱ्या विवा सिटी मॉलच्या विकासकाने हे आदेश पायदळी तुडवत वृक्षांची लागवड केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र तरीही महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने त्या ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचा खोटा अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या संदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
ठाणे येथील वर्तकनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या विवा सिटी या भल्या मोठय़ा मॉलच्या प्रवेशद्वाराजवळील आठ वृक्षांची दोन वर्र्षांपूर्वी बेकायदेशीररीत्या कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या तत्कालीन उपायुक्तांनी संबंधित विकासकाला कत्तल केलेल्या आठ वृक्षांच्या बदल्यात १५ वृक्षांची लागवड करण्यासंबंधीचा अहवाल तयार केला होता. त्यास सध्या रजेवर असलेले महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी १ ऑगस्ट २०११ मध्ये मान्यता दिली आहे, अशी माहिती चंद्रहास तावडे यांनी दिली.
प्रत्यक्षात, विकासकाने त्या ठिकाणी १५ वृक्षांची लागवड केल्याचे दिसून येत नाही. मात्र, असे असतानाही वृक्ष प्राधिकरण विभागाने या वृक्षांची लागवड केल्याचा खोटा अहवाल तयार केला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असेल तर मग ती वृक्ष गेली कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. असे असतानाही विवा सिटी मॉलच्या प्रवेशद्वारासमोरील पाच वृक्ष तोडण्यासंबंधीच्या ठरावास महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. या ठरावानुसार अनामत रक्कम भरणे व रीतसर कार्यालयीन लेखी परवानगी घेणे, अशा बाबींची म्हणेजच कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मात्र, तरीही वृक्ष तोडीची मान्यता देण्यात आलेली पाच वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आले आहे. बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी संबंधित विकासकावर गुन्हा दाखल असतानाही महापालिकेने त्यास पुन्हा वृक्ष तोडीची परवानगी दिली. तसेच परवानगीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच वृक्षांची तोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी १५ वृक्षांची लागवड करण्यात आलेली नसतानाही त्याची दफ्तरी नोंद करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय तावडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या संदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले असून त्यात या प्रकरणाच्या सविस्तर चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.