तालुक्यातील आसोदा येथे यात्रोत्सव सुरू असताना झालेला गोळीबार पोलिसांसह गावातील काही नेते मंडळी दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
२६ एप्रिलच्या मध्यरात्री हा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणात मुद्दामच निलंबित पोलीस सहकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. दंगलीत संशयिताजवळील गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाला. एक गोळी लागल्याने उमेश महाजन हा तरुण जखमी झाला, परंतु जखमीकडून तशी फिर्याद दिली गेली नाही किंवा घरच्या मंडळींनीच त्याच्यावर तसा दबाव टाकला असावा, असा आरोप गावातून आता होऊ लागला आहे. जखमीच्या पायाला जखम नेमकी कशामुळे झाली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. गोळीबार करणारी व्यक्ती तसेच ज्याला गोळी लागली असे सांगण्यात येते त्या दोघांच्या परिवाराचे संबंध सलोख्याचे असल्याची माहिती गावातूनच मिळते. त्यामुळेच गोळीबाराचा विषय दडपण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 8, 2013 3:06 am