आयपीएल स्पर्धेच्या लिलावात मराठवाडय़ाचा चेहराही तळपला आहे. जालन्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू व भारतीय युवा संघाचा कर्मधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघाने ३० लाख रुपयांत खरेदी केले. मागील वर्षी प्रथमच आयपीएल लिलावात १० लाख रुपयांत निवड होऊनही विजयला प्रत्यक्षात खेळण्याची संधी मात्र मिळाली नव्हती. या वर्षी मात्र जादा बोली मिळाल्याने व वर्षभरात क्रिकेटमध्ये केलेली चमकदार कामगिरी याच्या जोरावर मैदानात उतरण्याची संधी मिळण्याची उमेद विजय बाळगून आहे. विजयच्या रूपाने आयपीएलमध्ये मराठवाडय़ाचा एकमेव चेहरा तळपणार आहे.
सध्या दुबईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत आहे. तीन वर्षांपूर्वी (२०११) नाशिकला आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत चमकदार खेळी करून विजय प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील त्याची ४३७ चेंडूंत ४५१ धावांची तडाखेबंद खेळी त्याला मोठय़ा स्पर्धेत प्रवेश मिळण्यास साह्य़भूत ठरली. पुढे विजयच्या यशाची कमान सतत चढती राहिली. ऑस्ट्रेलियात झालेल्या १९वर्षांखालील संघांच्या विश्वचषक स्पर्धेत विजयने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ऑस्ट्रेलियातच जूनमध्ये भारताचा कर्णधार या नात्याने त्याने तिरंगी स्पर्धा गाजविली. आशिया चषक स्पर्धेत, तसेच सध्या दुबईत १९ वर्षांखालील युवकांच्या स्पर्धेतही भारताचा कर्णधार म्हणून आपला ठसा तो उमटवित आहे. रॉयल चॅलेंजरने मागील वर्षीच त्याला लिवावात खरेदी केले होते. त्यावेळी त्याच्यावर १० लाखांची बोली लावली होती. आता मात्र ३० लाख रुपये मोजून त्याला संघात घेतले. विजयचे वडील प्रसिद्ध फौजदारी वकील हरिभाऊ झोल यांनी आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.