अधिकाऱ्यांचे फावले तरी महापालिकेचे मात्र दुर्लक्ष

शहरात दिवसेंदिवस अवैध बहुमजली इमारतींची संख्या वाढत असून मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम करून बिल्डर लॉबी आणि खासगी रुग्णालय मालकांनी नियमांचे उल्लंघन केले. या सर्व प्रकाराकडे गेल्या काही दिवसात महापालिका प्रशासन आणि संबंधित अभियंते दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेत नगररचना विभागामध्ये अनेक नव्या इमारतींचे बांधकामासंबंधीचे नकाशे मंजूर केले जात नसल्यामुळे लोक ओरड करायचे तरी शहरातील बिल्डर लॉबी आणि रुग्णालयाचे मालक मंजुरीसाठी एक नकाशा टाकून बांधकाम मात्र सुधारित नकाशानुसार करायचे. असा प्रकार शहरात सर्रास केला जात होता. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, पुन्हा एकदा नियमात न बसतानाही अनेक अवैध बांधकामे शहरात सुरू आहेत. शहरात अनेक रिकामे भूखंड असून त्यांच्यावर गेल्या अनेक वषार्ंपासून कर आकारण्यात आला नाही. महापालिका सर्व रिकाम्या भूखंडांना नोटीस देण्यात आल्याचे सांगत असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेकांना नोटीसच मिळाली नसल्याची माहिती आहे. गेल्या चार पाच महिन्यांत महापालिकेच्या अतिमक्रमण विभागाने अनेक अवैध बांधकामे तोडली. ही बांधकामे तोडण्याच्या निर्णयापर्यंत राजकारणही बरेच झाले. शेवटी महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.
अनेक इमारतींमध्ये मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम करण्यात येते. कुठे पार्किंगसाठी, तर कुठे मजलेच्या मजले चढविले जातात. भविष्यात एफएसआय वाढवल्यास त्याचा फायदा मिळेल, या उद्देशाने अवैध बांधकामे करून अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरले आहेत. यासाठी मालकांना अधिकाऱ्यांनीच बाध्य केले असून मनपातील अभियंतेच या अवैध बांधकामांना जबाबदार आहेत. शहरात बांधकामासाठी एफएसआय वाढवून मिळाला आहे. बांधकाम नियमित करण्यासाठी जे अवैध बांधकाम असेल त्यावर अजूनही महापालिकेने कारवाई केलेली नाही. बऱ्याच वर्षांपासूनची बांधकामे नियमित करावी लागणार आहे. अशा बांधकामांचा महापालिको आयुक्तांनी सव्‍‌र्हे करून अतिरिक्त बांधकामे मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास महापालिकेला कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. अतिरिक्त बांधकामांचे नियमितीकरण झाल्यावर जास्तीचे बांधकाम तोडण्याची हिंमत नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दाखविली पाहिजे.