टाळमृदुंगाचा निनाद, ग्यानबा-तुकारामाचा अखंड नामघोष, गजाननमहाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजाननमहाराजांचा पालखी सोहळा चिंब पाऊस अंगावर झेलत सोलापुरात शुक्रवारी सकाळी दाखल झाला. तुळजापूर वेशीत सोलापूरकरांनी या पालखीचे उत्साहाने स्वागत केले.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्हय़ातील शेगावच्या श्री गजाननमहाराजांचा पालखी सोहळा ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मजल-दरमजल करीत सकाळी तुळजापूर मार्गे शहरात आला. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तुळजापूर वेशीजवळ श्री रूपाभवानी मंदिर चौकात महापौर अलका राठोड यांनी सोलापूरकरांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. सोलापूर महानगरपालिकेचा घसरलेला कारभार सुरळीत व्हावा व आर्थिक संकटाचे निवारण व्हावे, अशी प्रार्थना आपण गजानन् महाराजांच्या चरणी केल्याचे महापौर राठोड यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांच्या हस्ते पालखीतील श्री गजाननमहाराजांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसेवक सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, माजी नगरसेविका लता फुटाणे, अस्मिता गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शाहू शिंदे आदींनी पालखीचे दर्शन घेऊन या पालखी सोहळय़ातील शेकडो वारकऱ्यांचे स्वागत केले. सोरेगावच्या गजाननमहाराज देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने या पालखी सोहळय़ाचे स्वागत झाले. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनीही ‘श्रीं’चे सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले. या वेळी विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या पालखी सोहळय़ात ६५० वारकरी असून त्यात सुमारे ३५० गणवेशधारी व १५० जण हातात भगवे पताकाधारी आहेत. तीन अश्व, संगीत बँड पथक, तसेच रुग्णवाहिका असा लवाजमा आहे.
गेले दोन दिवस शहर व जिल्हय़ात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण असतानाच रस्त्यावर पालखीच्या स्वागतासाठी अनेक घरांपुढे सडासंमार्जन करून रांगोळय़ा व पायघडय़ा घालण्याचा भाविकांचा बेत यंदा चुकला. मात्र भर पावसात चिंब भिजत ‘श्रीं’चे दर्शन आणि पूजेसाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. स्वागतानंतर पालखी सोहळा सकाळच्या न्याहारीसाठी पावसातच थांबला होता.
अग्रभागी श्री गजाननमहाराज संस्थानचा मानाचा गजराज, मानाचे अश्व, टाळ-मृदुंगासह भजन व भक्तिगीतांचा निनाद, विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वर-तुकाराम, संत गजाननमहाराजांच्या नामाचा गजर, सोबत शेकडो वारकरी व फडकऱ्यांची शिस्तबद्धता, विशेषत: भागवतधर्माच्या उंच फडकणाऱ्या पताका, यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते. हळूहळू चालत आणि भाविकांचे स्वागत स्वीकारत हा पालखी सोहळा तुळजापूर वेशीतून कस्तुरबा भाजी मंडई, सम्राट चौक मार्गे दुपारी उशिरा श्री प्रभाकरमहाराज मंदिरात जाऊन विसावला होता.
भोजन व विश्रांतीनंतर हा पालखी सोहळा सायंकाळी ठरलेल्या मार्गावरून चालत रविवार पेठेतील कुचन प्रशालेत जाऊन रात्रीच्या मुक्कामासाठी विसावला.
उद्या शनिवारी सकाळी ‘श्रीं’ची पालखी शहरातील विविध मार्गावरून फिरून सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयात रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचणार आहे. नंतर तिसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी रेल्वेस्थानक, भय्या चौक, मरिआई चौक, देगाव नाका, तिऱ्हेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2013 रोजी प्रकाशित
गजाननमहाराजांच्या पालखी सोहळय़ाचे सोलापुरात भक्तिमय वातावरणात स्वागत
भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजाननमहाराजांचा पालखी सोहळा चिंब पाऊस अंगावर झेलत सोलापुरात शुक्रवारी सकाळी दाखल झाला.

First published on: 13-07-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well come to gajanan maharaj palkhi in devoted mood