सर्व समाजघटकांना सोबत घेत सामान्य माणसाचा विकास डोळय़ांसमोर ठेवून आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागाचा विकास साधला. त्यांच्या काम करण्याच्या हातोटीमुळे लोकांनी त्यांना अनेक वेळा निवडून दिले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी नव्या पिढीने डॉ. निलंगेकरांच्या बेरजेच्या राजकारणावर वाटचाल करावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
निलंगा येथे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव भोसले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, जयवंत आवळे, आमदार बसवराज पाटील, अमित देशमुख, वैजनाथ िशदे, अमर राजूरकर, कर्नाटकचे माजी मंत्री भीमण्णा खंड्रे आदी उपस्थित होते. या वेळी राज्यपाल चाकूरकरांच्या हस्ते डॉ. निलंगेकरांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘निष्ठावंत नेतृत्व’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल चाकूरकर म्हणाले, डॉ. निलंगेकरांनी विविध अडचणींवर मात करीत यश-अपयशाची तमा न बाळगता सक्रिय राजकारण केले. माझ्या राजकीय जीवनात केशवराव सोनवणे व डॉ. निलंगेकरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यातील धाडसी बाणा व निर्भय वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. निव्र्यसनी जीवन, कामाची धडाडी व सुसंस्कार यामुळे डॉ. निलंगेकरांची वाटचाल आजही तरुणाला लाजवेल अशी आहे. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, डॉ. निलंगेकरांचे नेतृत्व देशाला व राज्याला दिशा देणारे नेतृत्व आहे. सत्तेवर असताना अनेकांचे सत्कार होतात, परंतु सत्तेवर नसताना सत्कारासाठी उपस्थित असलेला हजारोंचा जनसमुदाय हा नेतृत्वाची साक्ष देणारा आहे. या कार्यक्रमासाठी मराठवाडय़ावर प्रेम करणारे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित आहेत. या नेत्यांनी मराठवाडय़ाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साथ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्याच्या प्रश्नाची जाण असणारे डॉ. निलंगेकर हे हजरजबाबी व प्रशासनावर पकड असलेले अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत. अशा कर्तबगार माणसाच्याच मागे लोक उभे राहतात. महाराष्ट्रातील अनेक विकासकामांना निलंगेकरांमुळे गती मिळाली आहे. मराठवाडय़ाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले. वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, ग्रामीण विकासाची नाळ असणारे डॉ. निलंगेकर हे द्रष्टे नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रात डॉ. निलंगेकरांमुळे झालेल्या सिंचन प्रकल्पामुळे या भागात आíथक सुबत्ता आली आहे. पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, स्व. विलासराव देशमुख, राज्यपाल चाकूरकर व डॉ. निलंगेकर या तीन नेत्यांमुळे लातूरची ओळख देशाच्या कानाकोप-यात झाली आहे. कार्यकर्त्यांना बळ व ताकद देणारे, कार्यकर्त्यांना सहकार्य करणारे असे हे द्रष्टे नेते आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. एल. एरंडे यांनी तर सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.