पिंपळगाव जोगाच्या अधिकाऱ्यांना घेराव
पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यासाठी दीड टीएमसी पाणी राखून ठेवत चार आवर्तने पूर्ण दाबाने देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या अभियंत्यांना घालण्यात आलेला घेराव मागे घेण्यात आला. सुमारे तीन तास हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात न आल्याने पाच दिवस तालुक्यात फारसे पाणी आलेच नाही, त्यामुळे आणखी पाच दिवस आवर्तन सुरू ठेवण्याचेही आश्वासन देण्यात आले.
पिंपळगाव जोगे धरणातील पाणी येडगाव धरणात सोडण्यात आल्याने पारनेर, तसेच जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली होती. येडगाव धरणात सोडण्यात येणारे पाणी त्वरित बंद करावे, टेल टँकपर्यंत पाणी पोहचण्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे या मागणीसाठी पारनेर तालुका कालवा कृती समिती, तसेच पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने पिंपळगाव जोगा प्रकल्पाचे अभियंता सिदमल यांना घेराव घालण्यात आला होता.
कालवा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, जी़ के. औटी, दत्ता खोमणे, गोरक्ष लामखडे, बाळासाहेब हाडवळे यांच्यासह सुमारे दीड हजार शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती.
आंदोलनानंतर येडगावमध्ये सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले. पारनेरचे हक्काचे पाणी राखून ठेवले जाईल, रब्बीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने सोडली जातील, असे लेखी आश्वासन प्रकल्पाचे अभियंता सिदमल यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.