मनसेचे आंदोलन नेहमीप्रमाणे ‘खळ्ळ खॅटक’ होणार नाही, हे बुधवारी बहुधा सगळ्यांनीच गृहीत धरले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनांच्या आधी मुंबईत जसे धास्तावलेले वातावरण असते, भीतीयुक्त कुतूहल असते तशी धास्ती बुधवारी कुठेही जाणवत नव्हती. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या संख्येतही लक्षणीय फरक पडलेला नव्हता. बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू होते. उलट कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे बेशिस्त वाहनचालकांनाही चाप बसला आणि उलट वाहतूक सुरळीत राहिली. दुपारच्या आधीच राज ठाकरेंना अटक (आणि नंतर लगेच सुटका) होऊन आंदोलन संपल्यामुळे नंतर तर आंदोलनाचा मागमुसही राहिला नाही. मुंबईच्या विविध रस्त्यांवर आंदोलनाच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून आमच्या प्रतिनिधींनी केलेले हे वृत्तांकन..
सकाळी ९.०० वाजता आंदोलन होणार म्हणून भल्या पहाटेपासूनच दहिसर चेकनाक्याच्या दोन किलोमीटरच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता. ९.०० च्या आसपास सगळे काही सुरळीत होते. वाहनांची संख्या आणि वर्दळ नेहमीप्रमाणेच होती. बसस्टॉपवर गर्दी होती, चहा-इडलीवाले फिरत होते, सगळं कसं नेहमीसारखंच सुरू होतं.
मात्र, ९.२५ ला दहिसरकडून मनसेचे सुमारे २००-३०० कार्यकर्ते अचानक जमले. टोलपर्यंत पोहोचता येत नसल्याचे लक्षात आल्यावर फ्लायओव्हरच्या अलिकडेच कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या देत गाडय़ा थांबवल्या. प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांसह रस्त्यावर बसले. कार्यकर्ते टोलनाक्यापर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांनी दोन टोलबुथ बॅरीकेड्स लावून बंद केले. फ्लायओव्हरवरून पोलिसांची एक तुकडी दहिसरच्या दिशेने गेली. कार्यकर्त्यांच्या भोवताली पोलिसांनी घेराव घातला. १०-१५ मिनिटे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘सरकार खाते तुपाशी, जनता राहते उपाशी’ आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी ट्रक, टेम्पोच्या टायरमधील हवा काढून टाकण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात फ्लायओव्हरजवळून जाणाऱ्या बेस्टच्या दोन बस पोलिसांनी मोकळ्या केल्या.
जेमतेम १५ मिनिटे हा कल्लोळ सुरू राहिला. अखेर ९.४५ वाजता आदेश आले आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना अल्लद उचलण्यास सुरुवात केली. पुरुष व महिलांना वेगवेगळ्या बसमध्ये कोंबण्यात आले. ९.५० ला हायवे मोकळा करण्यात आला आणि गाडय़ा पूर्ववत सुरू झाल्या. पोलिसांच्या धरपकडीतून सुटलेल्या आणि मागून आलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रस्ता अडवण्याचा किरकोळ प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो मोडून काढला. दोन-तीन मिनिटांत रस्ता मोकळा झाला आणि आंदोलनाची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी संपली..
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
दहिसर टोल नाका १५ मिनिटांचा रास्ता रोको..
सकाळी ९.०० वाजता आंदोलन होणार म्हणून भल्या पहाटेपासूनच दहिसर चेकनाक्याच्या दोन किलोमीटरच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता.
First published on: 13-02-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 minutes rasta roko at dahisar toll plaza