उन्हाळ्यामुळे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून तुटपुंज्या साधनांनिशी महापालिकेचा अग्निशमन विभाग या आगींचा यशस्वी सामना करत आहे. आज दुपारी रेल्वेस्थानक मालधक्क्य़ाजवळच्या गोदामात तसेच औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कंपनीत अशा दोन ठिकाणी पाठोपाठ आगी लागल्या व फक्त ३ गाडय़ा असल्यामुळे कोणती गाडी कुठे पाठवायची या विचारातून मनपाच्या अग्निशमन विभागाची धावपळ उडाली.
रेल्वेस्थानक मालधक्क्य़ाजवळच्या गोदामात दुपारी १ च्या सुमारास साखरेच्या पोत्यांना आग लागली. पाथर्डीतील साखर कारखान्याकडून येथील हुंडेकरी नावाच्या व्यापाऱ्यासाठी हा माल आला होता. साखरेची बरीचशी पोती यात जळून खाक झाली. खबर मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागातील अशोक पठारे, रोहिदास साळवे, सुभाष पवार, पांडूरंग मगर, कदम या जवानांनी २ गाडय़ांसह तिकडे धाव घेतली व थोडय़ाच वेळात आग आटोक्यात आणली.
दरम्यान अध्र्या तासातच औद्योगिक वसाहतीत आग लागल्याची दुसरी खबर आली. वर्धमान पॉलिमिक्स (प्लॉट क्रमांक जी १२) या कंपनीच्या मागील जागेत रसायन भरलेल्या पिंपांनी अचानक पेट घेतला. मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सावेडी विभागातील एका गाडीसह लगेचच तिकडे धाव घेतली. बापू मोरे, संजय शेलार, गोरख देठे हे जवान त्यांच्यासमवेत होते. तीही आग लवकरच आटोक्यात आणली गेली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गोदामे तसेच ज्वलनशील वस्तुंबाबत संबधितांनी काळजी घ्यावी असे आवाहन मिसाळ यांनी केले.