रानडुकरांपासून ऊसपिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या वीजप्रवाहाचा शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
खंडाळा तालुक्यातील येळेवाडी (बोरी) येथील सोनमाळ शिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसपिकाचे संरक्षण करण्यासाठी जंगली व रानटी प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सुमारे एक हजार फूट अंतरावरील ट्रान्सफॉर्मरकडे जाणाऱ्या विद्युततारेवर आकडा टाकून शेताभोवतीच्या कंपाऊंडमध्ये विद्युतप्रवाह सोडला होता. लगतच्या शेतातील बाजरीच्या पिकास पाणी देण्यासाठी रात्री आठच्या सुमारास व्यंकट बाबुराव अर्जुन (वय ६०), अशोक चंद्रकांत अर्जुन (वय ३५) रा. बोरी हे गेले. त्या वेळी शॉक लागून दोघांचाही मृत्यू झाला. दोघेही रात्री घरी न आल्याने सकाळी त्यांना पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याबाबत लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत किंद्रे करत आहेत.