भीषण दुष्काळ आणि टंचाईच्या पाश्र्वभूमीवर येथील बाजार समितीने दुष्काळग्रस्त गावासाठी तीन हजार लिटर क्षमतेचे २१ टँक उपलब्ध करून दिले असून प्रांताधिकारी सरिता नरके यांच्या हस्ते त्यांचे वितरण झाले.
अध्यक्षस्थानी समिती सभापती दिलीप बनकर होते. दुष्काळाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून दुष्काळग्रस्त परिसराला पाणी, चारा, उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी नागरिकांनी टंचाईला सामोरे जाताना चारा-पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कसे बळकट करता येतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नरके यांनी केले. निफाड तालुक्याच्या आणेवारीविषयी शासनाकडे शिफारस करून फळबागांना आणेवारी निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सभापती बनकर यांनी निफाड हा सधन तालुका असला तरी टंचाईमुळे दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे सांगितले.  टँकर, चारा व पाण्याचे टँक बाजार समितीने उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी बाजार समितीने सहा टँक वितरित केले तर आज २१ टँकचे वितरण होत आहे. यानंतरही टँक व चार पुरवठा करण्यासाठी समिती सज्ज असून ज्या गावांना चारा, टँकर, पाण्याच्या टाक्या लागतील त्यांनी तहसील कार्यालय व पंचायत समितीकडे प्रस्ताव द्यावेत त्यांना तातडीने मदत करण्याची ग्वाही दिली.