वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे दिवास्वप्न असतांना बुलढाणा जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालय, तीन उपजिल्हा सामान्य रुग्णालये, बारा ग्रामीण रुग्णालये व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण आरोग्यसेवांचे तीनतेरा वाजले आहेत. या रुग्णालयांमध्ये विशेषतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्व सामान्य व गोरगरिबांना आवश्यक व योग्य उपचार वेळेवर मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे.
जिल्ह्य़ातील रुग्णालयांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला असता जिल्ह्य़ातील शहरी भागातील प्रमुख रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची ३३ पदे, गट ‘ब’ ची २५ पदे, गट ‘क’ चे १ पद, तांत्रिक अधिकाऱ्यांची ४६ पदे, अधिपरिचारिकेची ५४ पदे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची १६ पदे, चतुर्थश्रेणी व कक्ष सेवकांची ५६ पदे रिक्त आहेत. जिल्ह्य़ातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची, परिवेक्षकीय श्रेणीतील १००, आरोग्यसेवक ४४, तर आरोग्यसेविकांची २८ पदे रिक्त आहेत.
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवांची १५ पदे रिक्त आहेत. केवळ ५ वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हे रुग्णालय चालविण्यात येते. वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ ची १४ पदेही रिक्त आहेत. विशेष म्हणजे, बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसृतीतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, हदयरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ, रक्तसंक्रमण अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य़रुग्ण विभाग ही महत्त्वाची वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्ण मोठय़ा प्रमाणावर येतात. शल्यचिकित्सा, बाळंतपण, नेत्ररुग्ण, रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड प्रमाणावर असते. विशेषतज्ज्ञ नसल्यामुळे या रुग्णांची हेळसांड होते. अशीच परिस्थिती खामगावात असून तेथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात गट ‘अ’ ची दहा पदे रिक्त आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य व गोरगरीब रुग्ण मोठय़ा प्रमाणावर येतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ व विशेषतज्ज्ञांच्या रिक्त पदांमुळे त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्येक विभागाची अत्याधुनिक शल्यगृहे आहेत. शल्यचिकित्सा, हदयरोग, स्त्रीरोग व प्रसृतीशास्त्र, बालरोग, नेत्ररोग, अस्थिव्यंग विभाग, रक्तसंक्रमण विभाग, यासह सर्व विभागांची स्वतंत्र दालने व रुग्णोपचार साधन सुविधा केंद्रे असतांनाही वैद्यकीय तज्ज्ञांशिवाय ही दालने उपयोगहीन झाली आहेत. सरकारी रुग्णालयातील विशेषतज्ज्ञांची पदे भरल्याशिवाय ही रुग्णालये सुरळीत चालू शकत नाहीत, हे विदारक वास्तव असतांना राज्य शासनाचा आरोग्य सेवा विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2013 रोजी प्रकाशित
बुलढाणा जिल्ह्य़ातील सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल २३१ पदे रिक्त
वैद्यकीय महाविद्यालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे दिवास्वप्न असतांना बुलढाणा जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालय, तीन उपजिल्हा सामान्य रुग्णालये

First published on: 18-12-2013 at 10:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 231 hospital seats vacant in buldana