ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घोडबंदर परिसरातील वसाहतींना २४ तास पाणीपुरवठा करण्याचा नवा प्रकल्प हाती घेतला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ‘स्टेम’ प्राधिकरणाकडे सोपवली जाणार आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या परिसराला होणाऱ्या पाणीगळतीचे प्रमाण अद्यापि २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पाणी चोरीच्या प्रकारांना आवर घालणेही महापालिकेला जमलेले नाही. असे असताना घोडबंदर भागात २४ तास पाणीपुरवठय़ाचा प्रकल्प राबवून शहरातील इतर भागांतही टप्प्याटप्प्याने हा प्रयोग सुरू करण्याचा विचार प्रशासन करत आहे. मात्र मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वसाहती आणि झोपडपट्टय़ांचा विळखा असलेल्या परिसरात ही योजना प्रत्यक्षात कशी राबवायची, असा प्रश्न पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांची लोकसंख्या एव्हाना २० लाखांपेक्षा पुढे गेली आहे. या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी महापालिकेला दररोज सुमारे ४५० दशलक्ष लिटर इतके पाणी पुरवावे लागते. महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २०० दक्षलक्ष लिटर, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होते. याशिवाय मुंबई महापालिका आणि स्टेम कंपनीकडून १६० दशलक्ष लिटर पाण्याचा अतिरिक्त पुरवठा महापालिकेस होत असतो. या पाण्याचे नियोजन केल्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. लोकमान्यनगर, सावरकरनगर, वर्तकनगर परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून या परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर भार पडत असल्याचे बोलले जाते. असे असताना शहरातील काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठय़ाचा प्रयोग राबविण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला असून घोडबंदर परिसरात हा प्रकल्प मोठय़ा स्वरूपात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
पातलीपाडा येथील वसाहतींना लाभ
ठाणे परिसरात अजूनही मीटर पद्धतीने पाणी बिलाची आकारणी होत नाही. पाणी बिल आकारताना ठरावीक पद्धतीने (फ्लॅट रेट) दराची आकारणी केली जात असल्यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणी वापराची मीटर पद्धतीने मोजदाद सुरू झाल्याने गैरवापराला आवर बसू शकणार असला तरी अद्यापही ही योजना प्रभावी पद्धतीने राबवली गेलेली नाही. शहरातील खासगी वसाहतींमध्ये मीटर बसविण्यात आले असले तरी बेकायदा वस्त्यांमध्ये अजूनही फ्लॅट रेट पद्धतीने पाणी बिलाची आकारणी होत आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यापूर्वी मीटर पद्धतीची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने आयुक्त असीम गुप्ता यांना सादर केला आहे. ठाणे महापालिकेने मध्यंतरी वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमध्ये यापूर्वी २४ तास पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र एका वसाहतीपुरता मर्यादित असलेल्या या प्रकल्पांचा विस्तार आता घोडबंदर परिसरापर्यंत केला जावा, असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने ठेवला आहे. घोडबंदर परिसरातील पातलीपाडा तसेच त्यापुढे खासगी वसाहतींमध्ये २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘स्टेम’ प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. पाण्याचे वितरण, नागरिकांना पाणी बिलाची आकारणी तसेच संपूर्ण यंत्रणेची देखभाल, दुरुस्तीचे काम ‘स्टेम’कडे सोपविण्यात येणार आहे.