लोकसभेसाठी मतदान करण्याची तारीख पाच दिवसांवर आली असून नागपूर जिल्ह्य़ात ३ लाख १३ हजार १६१ मतदार अद्यापही ओळखपत्रे आणि छायाचित्रापासून वंचित आहेत. जिल्ह्य़ात ३५ लाख ७४ हजार ८१० मतदारांपैकी ३२ लाख ६१ हजार मतदारांनाच छायाचित्रे व ओळखपत्रे देण्यात आली आहेत. 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्य़ात २२ मार्चपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. ८० हजार ६७६ नवीन मतदारांची भर पडली आहे. पूर्वी जिल्ह्य़ात ३४ लाख ९४ हजार १३४ मतदार होते. आता मात्र ३५ लाख ७४ हजार ८१० मतदारांची संख्या झाली आहे. त्यापैकी रामटेक लोकसभा मतदारसंघात १६ लाख ७५ हजार ४१५ मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदार ७ लाख ८९ हजार ५१५ तर पुरुष मतदार ८ लाख ८५ हजार ७९९ आहेत. त्यापैकी १५ लाख ९५ हजार ४६३ मतदारांजवळ ओळखपत्रे असून हे प्रमाण ९५.२३ टक्के आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ९९ हजार ३९५ असून पुरुष मतदार ९ लाख ७९ हजार ५८० तर महिला मतदार ९ लाख १९ हजार ७८१ आहेत. नागपूर मतदारसंघात १८ लाख ९९ हजार ३९५ मतदारांपैकी १६ लाख ६६ हजार १८६ मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. ८७.७२ टक्के हे प्रमाण आहे.
नागपूर जिल्ह्य़ात ३ लाख १३ हजार १६१ मतदारांना ओळखपत्रे आणि छायाचित्रे मिळालेली नसून या मतदारांनी निवडणूक यादीत नाव असणाऱ्या मतदारांना इतर वैकल्पिक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. या वैकल्पिक ओळखपत्रात वाहन परवाना, बँका, पारपत्र, आधारकार्ड, स्मार्टकार्ड, आयकर ओळखपत्र, निवृत्ती ओळखपत्र, निवडणूक विभागातर्फे देण्यात आलेले फोटो मतदार पावती आदी ग्राह्य़ धरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. वैकल्पिक ओळखपत्रे दाखवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले आहे. नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगम्यात आले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ
पूर्व नागपूर- ३१३४४२
पश्चिम नागपूर- ३१९७६०
उत्तर नागपूर- ३२८२७५
दक्षिण नागपूर- ३२७९४६
मध्य- २८४३५२
दक्षिण-पश्चिम नागपूर- ३२५६२०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामटेक लोकसभा मतदारसंघ
उमरेड- २७७८०८
हिंगणा- २८४१५८
काटोल- २४३२५९
सावनेर- २६५५०५
कामठी- ३६०९७३
रामटेक- २४३७१२