जिल्ह्य़ात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन मुले थोडक्यात बचावली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुर्गापूरच्या वेकोली पद्मापूर खुल्या खाणीच्या विस्तारीकरणासाठी बनवल्या गेलेल्या मोटाघाट नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला, तर दोन बालक थोडक्यात बचावले. ही घटना आज दुपारी सव्वा बारा वाजता घडली. येथील पवन उद्धव गेडाम (१३) व मुल येथील रंजित पत्रू गोंगले (८) अशी मृत पावलेल्या बालकांची नावे आहेत. शहरातील अथवा ग्रामीण क्षेत्रातील लोक रोजंदारीसाठी काही दिवसाकरिता पद्मापूरला विटाभट्टीच्या व्यवसायाकरिता आले आहेत. याच क्षेत्रात पद्मापूर खुल्या खाणीच्या विस्तारीकरणासाठी बनवल्या गेलेल्या नाल्याचे अर्धवट काम करण्यात आले आहे. हा नाला खोल असून चार ते साडेचार मीटर पाणी साचले आहे. आज दुपारी बारा वाजता चार मुले खेळण्याकरिता या भागात आले व नाला दिसताच आंघोळ करण्याकरिता नाल्यात उतरले. त्यातील दोन मुले खोल पाण्यात घसरून बुडाली, तर दोघांनी हे बघताच तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच विटाभट्टी व्यावसायिक व या क्षेत्रातील काही नागरिक घटनास्थळी पोहोचले. सोबतच दुर्गापूर पोलीसही तेथे आले. पानबुडय़ांच्या माध्यमातून मुलांची शोधमोहीम सुरू झाली, परंतु नाल्यात पाणी खोलवर व सर्वत्र चिखल असल्यामुळे मुलांचे मृतदेह मिळू शकले नाहीत.
दुर्गापूर पोलीस, पानबुडे व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मुलांच्या मृतदेहाचा शोध युद्धपातळीवर करीत आहे.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी या क्षेत्रात मोलाघाट नाल्यात काही लोकांच्या बुडण्याचे प्रकार झाले आहेत, परंतु वेकोलि व्यवस्थापनाला वारंवार तक्रारी करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
दुसऱ्या घटनेत नागभीड तालुक्यातील पाहर्णी येथील हर्षल विलास भगत (८) व साहिल गणेश भगत (१०) हे दोघे एकाच कुटूंबातील मुले गावाजवळील तलावात आंघोळीसाठी गेले असतांना त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच सायंकाळी उशिरा गावकरी मुलांचा शोध घेण्यासाठी तलावाजवळ आले असता दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना त्यांना दिसले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.