पाच दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूने दगावलेल्या येथील शारदा चौधरी या महिलेच्या ३० वर्षीय मुलाचाही स्वाईन फ्लूने नागपुरात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या चारवर पोहोचली आहे, परंतु हा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याविषयी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी तसा दाट संशय आहे.
गेल्या ११ फेब्रुवारीला धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत डॉ. विशाखा निकोसे यांचा स्वाईन फ्लूने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यावर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यापाठोपाठ येथील एकनाथपूरममध्ये राहणाऱ्या शारदा चौधरी या ५५ वर्षीय महिलेचा देखील नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना देखील स्वाईन फ्लूची लागण झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. शारदा चौधरी यांचा विवाहित मुलगा राहुल चौधरी याला छाती दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने वीस दिवसांपूर्वी त्याला नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची आई शारदा रुग्णालयात सतत सोबत होत्या. शारदा यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आणि पाच दिवसातच त्यांचा मुलगाही दगावला. राहुल चौधरी याचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याविषयी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी त्याचा दाट संशय आहे. अमरावती विभागात स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याने आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी जनजागृती करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक औषधसाठा ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय रजेवर न जाण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.