‘म्हाडा’च्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात आलेल्या घरांसाठीच्या सोडतीचा निकाल लागून आता महिना उलटून गेला तरी ४२७२ अर्जदारांची अनामत रक्कम अद्याप ‘म्हाडा’च्या तिजोरीत बंद आहे. अर्जदारांच्या नावातील त्रुटी वा बँक खात्याचा क्रमांक चुकल्याने ही रक्कम परत करणे शक्य झालेले नाही. ही रक्कम किमान साडेदहा कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
‘म्हाडा’तर्फे मुंबईतील १२४४ घरांसाठी मे महिन्यात सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी ८७ हजार अर्जदार रिंगणात होते. उत्पन्न गटानुसार दहा हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम अर्जासोबत अनामत ठेव म्हणून घेण्यात आली होती. ३१ मे रोजी या सोडतीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आठ-पंधरा दिवसांत सर्व अर्जदारांची अनामत थेट अर्जदारांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला हवी होती. पण अद्यापही ही प्रक्रिया संपलेली नाही. तब्बल ४२७२ अर्जदारांना अनामत रक्कम न मिळाल्याने ते हवालदिल झाले. त्यांनी ‘म्हाडा’कडे चौकशी सुरू केली. यानंतर अर्जदारांकडून नाव लिहिताना वा बँक खात्याचा क्रमांक लिहिताना काही त्रुटी राहिल्याने त्यांनी अर्जात लिहिलेल्या बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यात अडचण आल्याचे समोर आले आहे. यानंतर आता ‘म्हाडा’ने या सर्व ४२७२ अर्जदारांचे अचूक नाव आणि बँक खाते क्रमांक मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सर्व संबंधित ४२७२ अर्जदारांना ‘एसएमएस’ पाठवून सूचना देण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर नाव आणि खाते क्रमांक दुरुस्तीसाठी सोय करण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर ‘म्हाडा’कडून मिळालेला अर्जक्रमांक नमूद करून आपल्या तपशीलात दुरुस्ती करायची आहे. तपशील दुरुस्तीचे काम आठवडाभर चालणार असून त्यानंतर अर्जदारांनी नव्याने दिलेल्या नावावर आणि बँक खाते क्रमांकावर अनामत रक्कम परत केली जाईल, असे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.