जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात ६५ हजार ३२० कुटुंबे निराधार झाले असून त्यापैकी ५१ हजार १०९ कुटुंबांनाच मदत देण्यात आली. अजूनही १४ हजार २११ कुटुंबे मदतीसाठी शासकीय कार्यालयाच्या येरझाऱ्या मारत असल्याचे समजते.
सर्वाधिक हानीची झळ नागपूर जिल्ह्य़ाला बसली आहे. नागपूर जिल्ह्य़ात ४६ हजार ७३२ कुटुंबे निराधार झालेली असताना त्यातील फक्त ३९ हजार १३५ कुटुंबांना आर्थिक मदत प्राप्त झाली. दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्य़ाचा लागत असून या जिल्ह्य़ातील १४ हजार ६१२ कुटुंबे निराधार झाली. त्यापैकी ८ हजार १९७ कुटुंबांना मदत मिळाली. वर्धा जिल्ह्य़ातील ३१५८ निराधार कुटुंबांना मदत मिळाली. गडचिरोली जिल्ह्य़ातील ४४३ कुटुंब निराधार झाली असताना २४४ कुटुंबांना मदत देण्यात आली. गोंदिया जिल्ह्य़ातील २०७ कुटुंबे व भंडारा जिल्ह्य़ातील १६८ निराधार कुटुंबांना मदत प्राप्त झाली. निराधार झालेल्या कुटुंबीयांना एकूण २१ कोटी ५२ लाख रुपये मदत देण्यात आली. असे असले तरी अजूनही १४ हजार २११ कुटुंबापर्यंत मदत पोहोचलेली नसल्याचे स्पष्ट होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारान्वये जून ते सप्टेंबर २०१३ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात किती कुटूंब निराधार झाले, त्यापैकी किती कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली, तसेच किती कच्ची घरे व पक्क्या घरांचे अंशत व पूर्णत: नुकसान झाले, एकूण किती मदत केली, याची माहिती मागितली होती. या नैसर्गिक आपत्तीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात एकूण ८५ हजार ८७७ कच्च्या घरांचे अंशत व ३१० पक्क्या घरांचे पूर्णत: असे एकूण ८६ हजार १८७ कच्च्या घरांचे, तसेच २३७२ कच्च्या घरांचे पूर्णत, असे एकूण ८८ हजार ५५९ घरांचे नुकसान झाले. त्यापैकी ४८ हजार ९४७ घरमालकांना २० कोटी ५ लाख ६८ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यापैकी ४६ हजार ३८४ घरमालकांना फक्त १६ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. यावरून अद्यापपर्यंत ४९ टक्के घरमलाकांनाच मदत करण्यात आली असून ५१ टक्के घरमालक मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते.
यात नागपूर जिल्ह्य़ातील ४५ हजार ८१२ कच्च्या घरांचे अंशत:, तर ६७३ घराचे पूर्णत नुकसान झाले. अशा एकूण ४६ हजार ४८५ घरांचे नुकसान झाले असताना फक्त ६ हजार ९०३ घरमालकांनाच ३ कोटी १ लाख ८४ हजार रुपयाचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यापैकी फक्त ५ हजार २८९ घरमालकांना १ कोटी २८ लाख ८५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. यावरून नागपूर जिल्ह्य़ातील ३९ हजार ५८२ घरमालकांचा मदतीसाठी विचारच करण्यात आला नसल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्य़ात ४८३४ कच्च्या घरांचे व १२ पक्क्या घरांचे अंशत, तर ५३९ कच्च्या घरांचे पूर्णत नुकसान झाले. एकूण नुकसान झालेल्या ५ हजार ३८५ घरांपैकी ५ हजार ३७९ घरमालकांना २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये मदत करण्यात आली. भंडारा जिल्ह्य़ात ६ हजार ४८२ कच्च्या घरांचे अंशत, तर १५४ घरांचे पूर्णत नुकसान झाले. एकूण ६ हजार ६३६ घरांपैकी ६ हजार ६१६ घरमालकांना ४ कोटी १० लाख ९१ हजार रुपयाची मदत करण्यात आली. गोंदिया जिल्ह्य़ात ८०७८ कच्च्या घरांचे अंशत, तर ९० घरांचे पूर्णत नुकसान झाले. एकूण ८ हजार १६८ पैकी ७ हजार २१५ घरमालकांना ३ कोटी १३ लाख ८८ हजार रुपये मदत मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात १५ हजार १८ कच्च्या घरांचे अंशत, २९८ पक्क्या घरांचे, तर ५९३ कच्च्या घरांचे पूर्णत नुकसान झाले. एकूण १५ हजार ९०९ घरांचे नुकसान झालेल्या घरमालकांना ४ कोटी १६ लाख रुपये मदत करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्य़ात ५ हजार ६५३ कच्च्या घरांचे अंशत, तर ३२३ कच्च्या घरांचे पूर्णत, असे एकूण ५९७६ घरांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सर्व घरमालकांना १ कोटी ३३ लाख ३५ हजार रुपये मदत देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
प. विदर्भात ६५ हजार कुटुंबे निराधार
जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात ६५ हजार ३२० कुटुंबे निराधार झाले असून त्यापैकी ५१ हजार १०९ कुटुंबांनाच मदत देण्यात आली.
First published on: 19-02-2014 at 08:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65000 families unfounded in vidharbha