तब्बल सात वर्षे आणि १०६ कोटी रुपये खर्ची पडल्यानंतरही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नव्या मुख्यालयाची रडकथा सुरूच असून अद्यापही ही इमारत वापरासाठी सुसज्ज झालेली नाही. मूळ खर्चात १९ कोटी रुपयांची वाढ होऊनही या इमारतीचे काम अर्धवट आहे.
या इमारतीचे काम डिसेंबर २००४ मध्ये मंजूर झाले. कामाची मूळ रक्कम ८७ कोटी रुपये होती. वेळपत्रकाप्रमाणे डिसेंबर २०१२ अखेर या इमारतीचे काम पूर्ण व्हायला हवे होते, पण आता दोन वर्षे उलटली. सप्टेंबर २०१३ आणि आता डिसेंबर २०१४ अशी मुदत देण्यात आली, मात्र परिस्थितीत फरक पडलेला नाही. आता वाढीव खर्चाची रक्कम १०६ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात ‘एमएमआरडीए’ने कळवले आहे.
या इमारतीचे काम इतकी वर्षे का रखडले? कंत्राटदार कंपनीवर काही कारवाई केली का वा दंड आकारला का? या प्रश्नांवर काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे आपल्याच मुख्यालयाची इमारत वेळेत पूर्ण करण्याबाबत ‘एमएमआरडीए’ प्रशासन उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. ही ११ मजल्यांची इमारत कधी एकदा पूर्ण होणार याची चर्चा ‘एमएमआरडीए’मध्ये रंगली आहे.