देशभरात चढय़ा दरावरील कांद्याने राजकारण्यांसह सर्वाच्या डोळय़ात पाणी आणले असताना अलीकडे बाजारात आवक हळूहळू वाढल्यामुळे कांदा स्वस्त होऊ लागला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिध्देश्वर कृषी बाजारात गेल्या दोन दिवसांत तब्बल ८५० मालमोटारी भरून कांद्याची आवक झाली. ही आवक आणखी वाढत चालल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्याच्या भीतीने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. तर त्याच वेळी सामान्य नागरिक कांद्याचा दर आवाक्यात येत असल्याने समाधान व्यक्त करीत आहेत.
काल मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४४० मालमोटारीतून ४४ हजार िक्वटल कांदा दाखल झाला. तर आज बुधवारी दुसऱ्या दिवशी ३९४ मालमोटारींतून सुमारे ४० हजार िक्वटल कांद्याची आवक झाली. यातून दोन दिवसांत सुमारे १९ कोटींची उलाढाल झाली. पहिल्या दिवशी बाजार समितीत कांद्याचा दर किमान २०० ते कमाल ५१५० रुपयांपर्यंत होता. तर दुसऱ्या दिवशी त्यात घट होऊन १०० रुपये ते ४८०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूरची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारात सोलापूर जिल्हय़ासह सांगली, उस्मानाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे तसेच कर्नाटकातील विजापूर व गुलबर्गा या भागांतून कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. सोलापूरच्या बाजारात खरेदी केलेला कांदा पुढे लगेचच कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू आदी राज्यांना जातो. त्यासाठी मालाचा उठाव तत्काळ होतो, असे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धनराज कमलापुरे यांनी सांगितले.
या बाजार समितीमध्ये दररोज येणाऱ्या कांद्याची विक्री तत्काळ होते. तत्पूर्वी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समक्ष मालाचे वजन होते आणि विक्रीही होते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत कांदा विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते. यात पारदर्शकता तथा विश्वासार्हता असल्यामुळे बहुसंख्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असतो. त्यामुळे सोलापुरची कांदा बाजारपेठ संपूर्ण राज्यात लौकिक मिळवून असल्याचा दावाही कमलापुरे यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांत मोठय़ा प्रमाणात आवक झालेल्या कांद्यासाठी प्रत्येकी १५ हजार चौरस फुटाचे ५ सेल हॉल तसेच तात्पुरते पत्राशेड उपलब्ध झाले असले तरी कांद्याची वाढती आवक पाहता कृषी बाजारात अनेक रस्त्यांवर कांद्याची पोती उघडय़ावर पडून असल्याचे दिसून आले.