महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंच्या सातव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रात विविध प्रकारचे १,४१, ४८४ तंटे दाखल झाले असून त्यापैकी ८,९९० तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात यश आले आहे. या कामात नाशिकने आघाडी घेतली असून जळगाव जिल्हा मात्र मागे पडला आहे.
गावासाठी गावातच लोकसहभागातून सर्वमान्य तोडगा घडवून आणण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. यंदा या मोहिमेचे सातवे वर्ष असून परिक्षेत्रातील जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेताना उपरोक्त बाब पुढे आली आहे. स्थायी व समतोल विकास साधण्यासाठी समाजात शांतता व सुरक्षितता आवश्यक असते. त्याकरिता शासनाने या मोहिमेंतर्गत गावातील तंटे गाव पातळीवर मिटविले जावेत आणि गाव पातळीवर तंटे निर्माण होवू नये, हे प्रमुख लक्ष्य ठेवले आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला तंटामुक्त गाव समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. गावातील तंटय़ांच्या माहितीचे संकलन, वर्गीकरण व शासनाने दिलेल्या निकषानुसार त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविली गेली आहे. तंटे मिटविण्याच्या कामात त्यांना स्थानिक पोलीस ठाणे, तालुका विधी सल्लागार समिती, महसूल विभागाचे अधिकारी आदींचे सहकार्य मिळते.
सातव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक ग्रामीण या पाच जिल्ह्यांत आतापर्यंत एकूण १, ४१, ४८४ तंटे दाखल झाले आहेत. त्यात दिवाणी ३८१७० , महसुली ३७२७, फौजदारी ९७६८२, इतर १९०५ तंटय़ांचा समावेश आहे. या आकडेवारीचा जिल्हावार विचार केल्यास तंटे मिटविण्यात नाशिक अग्रेसर असल्याचे लक्षात येते. या जिल्ह्यात ५२,९३५ तंटे दाखल झाले. त्यापैकी ७,२७० तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात यश मिळाले. जळगाव जिल्हयात ३४, ५९४ तंटे दाखल झाले तर यापैकी एकाही तंटय़ाची सोडवणूक सामोपचाराने होऊ शकली नाही. यामुळे समितीच्या एकुण कामकाजाबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तुलनेत धुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या ७,२१८ पैकी केवळ १५५ तंटे मिटविण्यात आले. अहमदनगर मध्ये ४४,७४६ तंटे दाखल झाले. त्यातील १२५७ तंटे मिटविले गेले. नंदुरबार जिल्हयात दाखल झालेल्या तंटय़ाची संख्या २००१ असून ३०८ तंटे मिटवण्यात आल्याची माहिती मासिक अहवालात देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
नाशिक परिक्षेत्रात ८,९९० तंटय़ांची सोडवणूक
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंच्या सातव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रात विविध प्रकारचे १,४१, ४८४ तंटे दाखल झाले असून त्यापैकी ८,९९० तंटे सामोपचाराच्या माध्यमातून मिटविण्यात यश आले आहे.
First published on: 30-01-2014 at 09:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8990 quarles settled in nashik region