सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येणाऱ्या खारघर व्हॅलीशिल्प गृहसंकुलातील एक हजार २२४ घरांपैकी सोमवारी नेरुळ येथील आगरी-कोळी भवनाच्या सभागृहात झालेल्या सोडतीत १०२१ ग्राहक भाग्यवंत ठरले. घराची किंमत, कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये या घरांचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार आहे. यातील २०३ घरे शिल्लक राहिली असून यात प्रकल्पग्रस्त, पत्रकार, आमदार आणि सिडको कर्मचाऱ्यांच्या राखीव घरांचा समावेश आहे.
सिडकोच्या वतीने वर्षांला सहा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याप्रमाणे खारघर सेक्टर ३६ येथे अल्प, अत्यल्प, मध्यम, उच्च अशा सर्व प्रवर्गातील नागरिकांसाठी घरे बांधली जात आहे. मध्यम व उच्च वर्गासाठी प्रथम एक हजार २२४ घरांचा व्हॅलीशिल्प गृहप्रकल्प उभारण्यात आला असून या घरांचे काम प्रगतिपथावर आहे. याच संकुलाजवळ साडेतीन हजार अत्यल्प व अल्प उत्पन्न गटांसाठी बांधली जात आहेत. हे दोन्ही प्रकल्पांचे काम पुण्यातील बी.जी. शिर्के कंपनीच्या वतीने केले जात आहे. या घरांची जानेवारीत अर्ज विक्री काढण्यात आली होती. त्यात १३ हजार अर्ज विकले गेले पण तीन हजार ३१५ ग्राहकांनी अर्ज भरून दिले. त्यांपैकी १०२१ ग्राहकांना घरे मिळणार होती. त्यांची सोडत सोमवारी माजी न्यायमूर्ती ए. डी. अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर, फादर अल्मेडा, आणि ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांच्या उपस्थित ही सोडत आगरी-कोळी भवनात पार पडली. ही सोडत अंत्यत पारदर्शक आणि शांतपणे व सुरळीत संपन्न झाल्याचे सिडकोचे जनसंर्पक अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी सांगितले. १२२४ घरांसाठी २२ वेळा संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यात २०३ घरांसाठी अर्ज न आल्याने ती घरे रिकामी राहिली आहेत पण १०२१ भाग्यवंत ग्राहकांना या आलिशान संकुलातील घरांचा लाभ झालेला आहे. या संकुलात खासगी गृहप्रकल्पात आढळणाऱ्या स्विमिंग पूल, जीम, जॉगिंग ट्रॅक, यांसारख्या सर्व सुविधा असल्याने सिडकोने या घरांच्या किमती कमीत कमी ४९ लाख आणि जास्तीत जास्त एक कोटी ७ लाख अशा ठेवल्या आहेत. त्यामुळे या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद आला नाही. सिडकोने राज्य निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन सोमवारची सोडत काढली असून या संकुलातील भाग्यवंतांना नवीन वर्षांत, अर्थात जानेवारीत, या घरांचा ताबा मिळणार आहे.