आधार कार्डची मागणी होत असताना ज्यांना आधार कार्ड अद्याप आलेले नाहीत, त्यांच्यासाठी आधार ओळखपत्राच्या प्रताची तात्पुरती सोय शासनाने केली आहे. आधार योजना देशभरात राबवली जात आहे. ही योजना राबवण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.
देशात सर्वाधिक आधारची नोंदणी आणि आधार क्रमांकांची निर्मिती महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. तथापि, बहुतेक रहिवाशांना आधार ओळखपत्र प्रत्यक्षात प्राप्त झालेले नाहीत. याकरिता विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने(यूआयडीओआय) या नावाचे पोर्टल सुरू केलेले असून त्याद्वारे रहिवाशांना आधार ओळखपत्राची प्रत छापून घेता येते. ही प्रत विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाकडून डिजिटल स्वाक्षरीत असून त्याचा उपयोग आधार ओळखपत्र प्रत्यक्ष प्राप्त होईपर्यंत रहिवाशांना करता येईल. पोर्टलवर लॉग-ईन करून आधार पत्राची प्रत छापून घेण्याची सुविधा शासन निर्णयानुसार उपलब्ध करून देण्यात आलेली होती. ज्या रहिवाशांकडे इंटरनेट सुविधा, प्रिंटर्स इत्यादी उपलब्ध नाही अशा रहिवाशांकरिता महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्र यांच्यामार्फत दोन रुपये एवढे शुल्क अदा करून आधार पत्राची प्रत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तिचे मूल्य आता वाढविण्यात आले आहे.
आधार पत्राची साधी कृष्णधवल प्रत पाच रुपये तर रंगीत प्रत १५ रुपयाला करण्यात आली आहे. गॅस एजन्सीजमध्ये सध्या आधार कार्डची म्हणजेच आधार क्रमांकाची मागणी होते. गॅस क्रमांकाशी संलग्न करण्याकरिता ग्राहकांना आधार पत्राची प्रत देखील एजन्सीमध्ये छापून देण्यात येईल, अशा ग्राहकांनाकडून गॅस एजन्सीज आधार पत्राच्या छपाईचा दर वसूल करू शकतात. तथापि, ज्या रहिवाशांकडे आधार क्रमांक आहे किंवा आधार पत्राच्या छापील प्रतीची आवश्यकता नसेल त्यांच्यावर कोणतेही शुल्क आकारण्याची गरज नसल्याचे शुक्रवारी काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.