उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असताना लोकप्रतिनिधींकडून वाढदिवस वा तत्सम सोहळ्यांवर केली जाणारी उधळपट्टी हा वादाचा विषय ठरूनही त्याची तमा संबंधितांकडून बाळगली जात नसल्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू समाजवादी पक्षाचे आमदार शरद गावित यांनी हा पराक्रम केला आहे. या महोदयांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघ शुभेच्छा फलकांनी ओतप्रोत भरेल याची पुरेपूर दक्षता घेतलीच, शिवाय अतिशय उत्सवी स्वरूपात हा सोहळा साजरा होईल याचीही तजवीज केली होती. कोणतीही चाड न बाळगता साजऱ्या झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कान टोचले असतानाही या पक्षाच्या मंत्र्यांसह पदाधिकारीही तितक्याच उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने नवापूरवासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
मागील तीन ते चार दशकांत कधी नव्हे, अशा गंभीर दुष्काळी स्थितीला महाराष्ट्राला सामोरे जावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेकडो गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खुद्द आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात टंचाईच्या तीव्र झळा दुर्गम पाडय़ांना बसत असताना खुद्द लोकप्रतिनिधीने वारेमाप उधळपट्टी करून आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करावा, ही बाब वादग्रस्त ठरली आहे. लोकप्रतिनिधीकडून दुष्काळाऐवजी आपल्या वाढदिवस सोहळ्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद गावित हे त्याचे एक उदाहरण. आ. गावित हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असले तरी राष्ट्रवादीशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. कारण, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे शरद गावित यांचे बंधू. यामुळे त्यांचा पक्ष नावाला समाजवादी असला तरी त्यांचे सर्व काम राष्ट्रवादीचे सुरू असते, हेदेखील नंदुरबारवासीयांना माहीत आहे. दुष्काळाची गंभीर दखल खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली आहे. त्यामुळेच राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या कुटुंबातील जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजनावर पवार यांनी टीकास्त्र सोडले होते. ज्येष्ठ नेत्यांकडून मंत्री व लोकप्रतिनिधींना कानपिचक्या देऊनही परिस्थितीत काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
सामाजिक संस्था, आमदार व शासकीय अधिकारी आदींकडून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे. पाणीटंचाईच्या संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गुरांसाठी चारा नसल्याने त्यांना मोकाट सोडून दिले जात आहे. काही शेतकऱ्यांना अपरिहार्यपणे गुरे विकून टाकणे भाग पडले. पाण्यासाठी सर्वाची वणवण सुरू आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण सोडून कुठे डोक्यावर, तर कुठे सायकलने पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करताना दिसत आहे. या परिस्थितीत काही घटकांनी सत्कार व तत्सम सोहळे खुंटय़ावर टांगून त्यातून बचत होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचे औदार्य दाखविले आहे. अशा एकूण वातावरणात आ. शरद गावित यांचा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला. त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण नवापूर शहर शुभेच्छा फलकांनी विद्रूप करून टाकले. जाहिरातबाजीवरही लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. एवढेच नव्हे तर, या दिवसाचे औचित्य साधून आदिवासी उपयोजनेंतर्गत ३०० लाभार्थ्यांना पाइप वितरणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीत झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्र्यांसह पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या वेळी हार-गुच्छांचा व शालींचा पाऊस पडला. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनीता वळवी, माजी नगराध्यक्ष गोविंदराव वसावे आदी राष्ट्रवादीची मंडळी उपस्थित होती. मुळात, शासकीय योजनेचा कार्यक्रम आमदाराच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित करणे हादेखील वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. या प्रकाराने नवापूरवासीयांकडून रोष प्रगट केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
आदिवासी दुष्काळात, आमदारांचा वाढदिवस दणक्यात
उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असताना लोकप्रतिनिधींकडून वाढदिवस वा तत्सम सोहळ्यांवर केली जाणारी उधळपट्टी हा वादाचा विषय ठरूनही त्याची तमा संबंधितांकडून बाळगली जात नसल्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे.

First published on: 13-04-2013 at 12:43 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aboriginal in drought heavy celebration of mla birthday