पुणे-आळंदी रस्त्यावर विश्रांतवाडी येथे मंगळवारी रात्री सायकलवर चाललेल्या दोघांना ट्रकने
पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये सायकलवरील दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अनिल शांताराम खानविलकर (वय ३८, रा. नवी खडकी, येरवडा) आणि शैलेश हरिभाऊ देवकर (वय २२, रा. चौधरीनगर, टिंगरेनगर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राजू नागू पवार (वय ३०, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल व शैलेश हे दोघेजण खतांच्या कंपनीत कामाला आहेत. ते मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काम संपवून घरी सायकलवरून घरी जात होते. त्यावेळी विश्रांतवाडी मेन्टल कॉर्नरजवळ त्यांना ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये खाली पडून गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी ट्रक चालकास रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारोडे हे अधिक तपास करत आहेत.