राज्यातील कोणत्याही महामार्गावर प्रवास करताना समजा तुमच्या गाडीला अपघात झाला किंवा रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या अपघाताची माहिती घरापर्यंत पोहोचवायची असेल तर मोबाइल फोनवरील एका क्लिकसरशी ती पोहोचू शकणार आहे. त्यासाठी मात्र तुम्ही ‘स्वरक्षा’चे मोफत अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केलेले हवे. हे तंत्रज्ञान नवीन  गोयंका नावाच्या एका वीस वर्षीय तरुणाने शोधून काढलेले असून सोमवारी राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने त्याने ते लोकार्पण केले.
जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होत असून ही संख्या वर्षांत एक लाख तीस हजारांपर्यंत गेली आहे. रस्ते अपघाताचे हे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहेत. अपघात झाल्यानंतर वेळीच न मिळणाऱ्या प्रथमोपचारामुळे अनेकांचे जीव दगावलेले आहेत. उपचाराअभावी अपघातात मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांसाठी काही करता येण्यासारखे असले तर करावे या एकाच ध्येयाने झपाटलेल्या नयन गोयंका या एनर्जी लॅबमधील तरुण अभियंत्याने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर एक अ‍ॅप्लिकेशन शोधून काढले असून ते त्याने आज विनामोबदला देशाला समर्पित केले. इंटरनेट असणाऱ्या कोणत्याही मोबाइलवरून गुगलद्वारे हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवल्यास ते स्वत:साठी किंवा रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कामी येणार आहे. कोणतेही अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमधील जागा व्यापून टाकत असल्याने त्यावर फुल्ली मारण्याचाच तरुणाईचा जास्त कल दिसून येतो. मात्र हे अ‍ॅप्लिकेशन केवळ दोन एसएमएसची जागा घेणार आहे. त्यामुळे ते आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून ठेवण्यास काहीही हरकत नाही.
राज्यात प्रवास करताना समजा तुमच्या गाडीला अपघात झाला आणि तुम्ही ही माहिती घरी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याच्या विचारात आहात तर हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या मदतीला धावून येणार आहे. तुमच्या किंवा तुमच्या सहकाऱ्याकडे हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध असल्यास एका क्लिकसरशी ते तुम्ही नोंद केलेल्या नातेवाईकांचा मोबाइल, पोलीस नियंत्रण कक्ष, जवळचे रुग्णालय यांना माहिती दिली जाईल. यामुळे अपघाताचे ठिकाण पोलिसांना तसेच नातेवाईकांना कळणार आहे. हेच अ‍ॅप्लिकेशन रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी झालेल्या अपघाताची माहिती देण्यासही उपयोगी पडणार आहे. बंद पडलेली गाडी खेचून न्यायची असेल तरीही हे अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला मदतीला धावून येणार आहे. पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर चालणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशनसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविल्या जाणार असून तोपर्यंत ते मोफत डाऊनलोड करता येण्यासारखे आहे.
नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कांबळे, उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या लोकोपयोगी अ‍ॅप्लिकेशनचे कौतुक केले.