गिट्टीखदान परिसरातील वंृदावन कॉलनी चौकात सकाळच्यावेळी स्कूल बस आणि टाटा वाहन यांच्यात जोरदार धडक झाल्याने त्यात चार विद्यार्थिनी आणि गाडीचालक जखमी झाला. जखमींना  मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात उसळळेल्या गर्दीमुळे सकाळी दीड तास वाहतूक खोळंबली होती.
सिव्हील लाईनमधील सेंट उर्सुला शाळेची बस गिट्टीखदान परिसरातील विद्यार्थिनींना घेऊन येत होती. वृंदावन कॉलनी चौकातून जात असताना समोरून भरधाव येणारी  टाटा ४०६ गाडी रस्ता दुभाजक तोडून बसवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात बसली की बस दोन्ही गाडय़ांच्या काचा फुटल्या आणि टाटा गाडी उलटली. बसमध्ये बसलेल्या विद्यार्थिनीना काय झाले ते कळलेच नाही.
बसमध्ये १५ विद्यार्थिनी होत्या. त्यापैकी चार विद्यार्थिनींना जबर मार बसला. घटना घडताच परिसरातील लोक घटनास्थळी धावले. गिट्टीखदान पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल्यावर पोलीस पोहोचले. टाटा गाडीचा चालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला लागलीच मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले तर बसमध्ये जखमी झालेल्या साक्षी मांडवकर, संगीता बेलखोडे, नेहा डोळे आणि आकांक्षा ढोबळे या विद्यार्थिनींना परिसरातील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. एका विद्यार्थिनीच्या डोक्याला तर अन्य तीन विद्यार्थिनींच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे. अपघातामुळे घाबरलल्या विद्यार्थिनी सारख्या रडत होत्या. स्कूल बस चालकाने शाळेला अपघाताची माहिती दिल्यावर शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थिनींच्या पालकांना कळविण्यात आल्यावर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
स्कूल बस चालकाने वेळीच ब्रेक मारल्याने मोठी घटना टळली असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. टाटा ४०६ गाडी काटोलवरून नागपूरला येत होती. त्या गाडीत कोणी बसले नव्हते. गाडी रस्ता दुभाजकावर चढल्यामुळे क्रेनने तिला बाजूला करण्यात आले. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.