‘लोकनेता कॉ. जे. पी. गावित’ संदर्भ ग्रंथाचेही प्रकाशन
लुप्त होत असलेल्या ग्रामीण लोककलांचे संवर्धन करण्याच्या हेतूने गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने कळवण तालुक्यातील अभोणा येथे २९ व ३० नोव्हेंबर रोजी आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत माजी आमदार कॉम्रेड जिवा पांडू गावित यांनी सुरगाणा, कळवणसह जिल्ह्य़ात वनजमिनींसाठी दिलेला लढा तसेच आदिवासी, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर ३५ वर्षे केलेल्या कार्याची दखल घेत गिरणादूत प्रकाशनच्या वतीने ‘लोकनेता कॉ. जे. पी. गावित’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती हेमंत पाटील, हेमंत वाघेरे, इंद्रजित गावित आदींनी दिली आहे.
अभोणा येथे ३० नोव्हेंबर रोजी तीन वाजता संदर्भग्रंथाचे प्रकाशन निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गांवकरीचे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड उपस्थित राहणार आहेत. ग्रंथ प्रकाशनासह कॉ. गावित यांचा गौरवही करण्यात येणार आहे.
याशिवाय दोनही दिवस आदिवासी लोककला महोत्सव व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. थाळ गाण कथा, ढाका, घांगळ, नंदी बैल, पावरी वादन, धिंडवाळी गीत, डोंगऱ्यादेव गीते, नृत्य व गायन अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना रोख बक्षिसे व मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. ए. टी. पवार, नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.