बालविकास प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात अतिरिक्त सेविकांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी वयोमर्यादेची अट ३५ वर्षांपर्यत शिथील करण्याची मागणी आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक जिल्हा संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्य़ात चार हजार ७७६ अंगणवारी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी १० वी उत्तीर्ण आणि २१ ते ३० वर्ष वयोगटातील स्थानिक महिलांना गुणवत्तेनुसार प्राधान्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत कार्यरत आशा कर्मचारी २००७ पासून अल्प मानधनावर गावांमध्ये काम करीत आहेत. या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य मिळावे तसेच त्यांच्या वयाची मर्यादा ३५ वर्ष करण्याची मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, सरचिटणीस सुरेखा पवार, मनिषा खैरनार आदीेंनी केली आहे.