शाहू मिलमधील २७ एकर जागेमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक बनविण्यामध्ये शासनाने सक्रिय पावले उचलावीत या मागणीसाठी रविवारी शाहू प्रेमी नागरिकांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रस्तावासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सहकार व पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच हा विषय विधिमंडळात चर्चेला घेऊन त्या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
 शाहू मिलमधील २७ एकर जागेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या सर्वव्यापी कार्याचा आढावा घेणारे स्मारक बनविण्यात यावे, अशी मागणी कोल्हापुरात जोर धरू लागली आहे. या मागणीवरून सामाजिक कार्यकर्त्यांनी आठवडाभरापासून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. छगन भुजबळ व हर्षवर्धन पाटील या मंत्र्यांनी स्मारकाबाबत अनुकूल मत व्यक्त केले आहे. तथापि राज्य शासनाने याबाबतीत पुढाकार घ्यावा आणि नागपूर अधिवेशनातच त्याची घोषणा व्हावी, या करीत शाहूप्रेमी कार्यकर्ते अग्रही आहेत.
रविवारी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ शाहूप्रेमी, बहुजन मंच व शाहू मिलचे निवृत्त कर्मचारी जमले. महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनास सुरुवात केली.पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, दीपा पाटील, शाहू मिल कर्मचारी संघाचे पांडुरंग पाटील आदींची भाषणे झालीत. त्यांनी राज्य शासनाने नागपूर अधिवेशनात शाहू मिलमध्ये शाहू महाराजांचे स्मारक बनविण्याची घोषणा करावी, अशी मागणी केली. तसेच जिल्ह्य़ातील खासदार व आमदार यांनीही या मागणीकरिता शासनाकडे प्रयत्न करावेत, अशीही मागणी करण्यात आली. स्मारकाच्या कामाला गती देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. स्मारक बनविण्यासाठी शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्णयही घेण्यात आला. आंदोलनात १०० हून कार्यकर्ते व कर्मचारी सहभागी झाले होते.