राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या कार्यशैली आणि वर्तनावर समाधानी नसल्याचे कारण सांगून त्यांना शहर अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करीत शहरातील विविध आघाडीतील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आज मुंबई गाठून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्याकडे राजीनामे दिले. जो पर्यंत राजीनामा देणार नाही तो पर्यंत पक्षाचे काम करणार नाही असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.   
गेल्यावर्षी महापालिकेच्या निवडणुकीनंतर अजय पाटील यांच्या विरोघात पक्षातील एक गट सक्रिय असताना त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या मात्र, पक्षाने पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांची पुन्हा एकदा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मधल्या काळात अजय पाटील मोहीम शांत झाली असताना पुन्हा एकदा पक्षाचे काही  कार्यकर्ते सक्रिय झाले असून अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली विविध आघाडय़ांचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अजित पवार आणिमधुकरराव पिचड यांच्याकडे पदाचे राजीनामे सोपविले. अजय पाटील यांच्या विरोधातील तक्रारीचा पाढा वाचताना त्यांची शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्याशिवाय पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा दिला.
अजय पाटील यांच्या विरोधातील असंतोष समोर आला होता. पक्षाचे नेते दिलीप पनकुले यांनी त्यांच्यावर यापूर्वी आरोप केले होते त्यामुळे पाटील आणि पनकुले हा छुपा संघर्ष शहर राष्ट्रवादीत सुरू आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे ८ सदस्य असताना स्थायी समितीच्या सदस्यपदी त्यांच्या पत्नी प्रगती पाटील यांची दुसऱ्यांदा वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. याची अजित पवार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे प्रगती पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. अजय पाटील कार्यकर्त्यांना विश्वास घेत नसल्याच्या तक्रारी कायकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती अहिरकर यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर, नगरसेवक सीमा राऊत, सय्यद ताहील, शैलेंद्र तिवारी, सुनील राऊत, बजरंगसिग परिहार, रत्नकला बलराज, प्रवीण कुंटे, जानबा मस्के, सुरेश पाटील, राजू जैन, चंद्रशेखर तिडके, विशाल लारोकर आदी पदाधिकारी मुंबईत गेल्याचे सांगण्यात आले.
राजीनामा देणार नाही -अजय पाटील
या संदर्भात शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जोपर्यंत पक्षश्रेष्ठी आदेश देत नाही तो पर्यंत राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याविरोधात मुंबईला गेले आहे त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी काय केले, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. एकही क्रियाशील सदस्य त्यांनी तयार केले नाही. महापालिकेच्या  निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती मात्र ते स्वत निवडून आले नाहीत. गेल्या वर्षभरात पक्षात कुठलेही संघटनात्मक काम केले नाही. मुंबईला जाण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ आणि पैसा आहे मात्र पक्षाच्या एखाद्या कार्यक्रमासाठी त्यांना वेळ देता येत नाही. या संदर्भात अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याशी तूर्तास काहीच बोलणे झाले नाही मात्र त्यांच्याकडून काही आदेश आलेच तर राजीनामा देईल, असेही पाटील यांनी ‘लोकसत्ता’ बोलताना सांगितले.