राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरूकूंज मोझरी येथील अवैध दारूविक्रीच्या प्रकरणात लोकलढा पेटलेला असताना दारूविक्रेत्यांकडूनच नागरिकांना धमक्या मिळू लागल्याने गावात संतापाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी संतप्त नागरिकांनी दारूविक्रेत्याला बदडले. त्यानंतर पोलिसांनी दारूबंदीचा आग्रह धरणाऱ्या दोघांना अटक केल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे.
मोझरी येथील मंजुळामाता नगर परिसरात अवैधरीत्या दारूविक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक वेळा करूनही पोलीस यंत्रणेने त्याची दखल न घेतल्याने या भागातील रहिवाशांनी आता रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १५ दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्य सुधीर बारबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दारूबंदीसाठी आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात तिवसा पोलिसांसह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले, पण अवैध दारूविक्री सर्रास सुरू होती. याऊलट दारूबंदीसाठी एकत्र आलेल्या नागरिकांनाच धमक्या दिल्या जात होत्या. ऐन दिवाळीच्या दिवशी अवैध दारूविक्रेता महेंद्र ठाकूर याने दिनेश ठाकरे या कार्यकर्त्यांला धक्काबुक्की केली. त्यानंतर काही नागरिक पोलिसांकडे पोहोचले. अवैध दारूविक्रीविषयी माहिती द्या, आम्ही कारवाई करू, असे आश्वासन देऊन पोलिसांनी या नागरिकांची बोळवण केली.
बुधवारी मंजुळामाता नगर परिसरात एका महिलेच्या घरी दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पण पोलिसांनी कारवाईला उशीर केला. तोपर्यंत कारवाईची कुणकूण लागल्याने हा साठा अन्यत्र हलवला गेला. पोलिसांना छाप्यात काहीच आढळले नाही. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलेने नागरिकांना पोलिसांसमोरच शिवीगाळ केली. स्वत:चे कपडे फाडून आणि डोके फोडून घेत खोटी तक्रार देण्यासाठी ती मोझरी पोलीस चौकीत पोहोचली. त्यावेळी लोकांनीही पोलीस चौकीत धाव घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. त्यातच महेंद्र ठाकूर याने सुनील बारबुद्धे यांना मारहाण केल्याने प्रकरण चिघळले. महेंद्र ठाकूर हा पोलीस चौकीत पोहोचताच नागरिकांनी मारहाण केली, पण त्याने पोलिसांसमक्ष सुनील बारबुद्धे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चौकीसमोरच महेंद्र ठाकूर याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून महेंद्र ठाकूर याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. यात पोलीस शिपाई अजय थोटे यांच्यासह काही लोक किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी नंतर हल्लेखोर दोघांना अटक केलीच शिवाय, दारूबंदीसाठी आंदोलन करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनाही अटक केल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
मोझरीतील दारूबंदी आंदोलन चिघळले; संतप्त जमावाची दारूविक्रेत्याला मारहाण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरूकूंज मोझरी येथील अवैध दारूविक्रीच्या प्रकरणात लोकलढा पेटलेला असताना दारूविक्रेत्यांकडूनच नागरिकांना धमक्या मिळू लागल्याने गावात संतापाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी संतप्त नागरिकांनी दारूविक्रेत्याला बदडले. त्यानंतर पोलिसांनी दारूबंदीचा आग्रह धरणाऱ्या दोघांना अटक केल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे.
First published on: 17-11-2012 at 12:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol baned andolan gets starmbled in mozri one group bit the seller at the incident