राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची पुनर्रचना केली असून, राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाची कामे एक मुख्य अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखालील दोन राष्ट्रीय महामार्ग मंडळांच्या अखत्यारित आणली आहेत.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यान्वयन (तांत्रिक) राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांच्याकडून करण्यात येते. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची बरीचशी लांबी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पात समाविष्ट झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बऱ्याच विभाग आणि उपविभागांकडील राष्ट्रीय महामार्गाचा कार्यभार कमी झाला आहे, तर काहींकडे अजिबात कार्यभार उरलेला नाही.
सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडील कार्यभार विचारात घेऊन, कामाचा समतोल राखण्यासाठी आणि कामावर योग्यप्रकारे देखभाल व परिणामकारक नियंत्रण ठेवून कामात सुसूत्रता व प्रशासकीय नियंत्रण राहावे असा विचार प्रशासनात सुरू होता. याच उद्देशाने, इतर राज्यातील राष्ट्रीय महामार्ग संघटनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाची कामे एकाच मुख्य अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली असून, त्यांच्या अखत्यारित दोन राष्ट्रीय महामार्ग मंडळे आणली गेली आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभाग यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांर्तगत राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग मंडळ, बांद्रा, मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळ, औरंगाबाद अशी दोन राष्ट्रीय महामार्ग मंडळे ठेवून त्यांच्या अधिपत्याखाली विभाग व उपविभाग पुनर्रचित करण्यात आले आहेत. सध्या मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम) प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखाली असलेले अधीक्षक अभियंता, मुंबई रस्ते विकास व संकल्पचित्र मंडळ, बांद्रा, हे कार्यालय मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) यांच्या अधिपत्याखाली आणून त्याचे नामाभिधान अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ बांद्रा, मुंबई असे करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे पाहणारे अधीक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, औरंगाबाद हे मंडळ कार्यरत आहे. त्याचे नामाभिधान अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, औरंगाबाद असे करण्यात आले आहे. विदर्भातील सर्व राष्ट्रीय महामार्गाची कामे या महामार्ग मंडळाच्या नियंत्रणाखाली असतील. या दोन्ही मंडळांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या विभागांची व उपविभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे.
या बदलामुळे विदर्भातील राष्ट्रीय महामार्गाची कामे पाहणाऱ्या विभागांमध्ये बदल झाले आहेत :  नागपूरला मुख्यालय असलेला राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र. १४ हा औरंगाबाद मंडळाच्या अधिपत्याखाली येणार असून त्यात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ५१, तसेच विशेष प्रकल्प उपविभाग क्र. १ आणि २ यांचा समावेश आहे.
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र. १३ चे समावेशन सार्वजनिक बांधकाम मंडळ, अमरावतीमध्ये करण्यात आले आहे. या बदलानुसार, अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ५२ व ५८, तसेच अकोला येथील विशेष प्रकल्प उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ६० हे अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतील. नागपूरचा राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ४९ व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उपविभाग, तसेच भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ५५ यांचे समावेशन सार्वजनिक बांधकाम विभाग, भंडारा यात करण्यात आले आहे.