केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार असल्याने त्यांच्या कार्यकाळात एकही बैठक नीट होऊ नये, म्हणून काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी हातमिळवणी केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी गुरुवारी केला.
जि. प.च्या सर्वसाधारण सभेत सिंचन निधीवरून गदारोळ झाला. साडेतीन कोटींचा निधी वितरीत करताना इतिवृत्तात आवश्यकतेनुसार वितरीत केला जाईल, असे म्हटले होते. ‘आवश्यकतेनुसार’ या शब्दावर आक्षेप घेत झालेल्या गदारोळामुळे सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष विजया चिकटगावकर यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी हातमिळवणीचा आरोप केला.
वैजापूर येथे जि. प.ची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करीत जि. प. सदस्य वैजापूरच्या सभेला अनुपस्थित राहिले. अधिकारी उपस्थित नाही म्हणून शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. कोणताही विषय चर्चेत न घेता केलेला हा सभात्याग केवळ राजकारणाचा भाग असल्याचे चिकटगावकर म्हणाले. वैजापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने त्या राजकारणातून विजयाताई चिकटगावकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जि. प.च्या सर्वसाधारण सभेत जलसंधारणाचा साडेतीन कोटींचा निधी समान वितरीत व्हावा, अशी सदस्यांची मागणी होती. ती मान्य झाली नाही. जलसंधारणाची कामे वाटप करण्यासाठी नेमलेल्या समितीने निधी वितरण करण्याचे ठरविले होते. उलट ४० सदस्यांच्या मतदारसंघात लाभ होईल, असे वितरण केल्याचा दावा चिकटगावकर यांच्या वतीने करण्यात आला. वैजापूर तालुक्यातील काही सदस्य जाणीवपूर्वक असे राजकारण घडवून आणत असल्याचे ते म्हणाले.