पाणीटंचाईने हैराण झालेल्या जनतेला पाण्यासाठी आता मुद्दय़ावरून गुद्दय़ावर यावे लागत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. शुक्रवारी शहराच्या प्रभाग तीन व चारमधील पाणीपुरवठय़ावरून याचे प्रत्यंतर आले. विशेष म्हणजे दोन नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी किरकोळ मारामारीही झाली. मात्र, एकूणच उन्हाच्या काहिलीत पाणीप्रश्नही चांगलाच ऐरणीवर येत चालल्याचे दिसून येत आहे.
एन १३, वानखेडेनगर, डी सेक्टर, मुजफ्फरनगर हा भाग समाविष्ट असणाऱ्या प्रभागात पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार काही लोकांनी या प्रभागात राहत असलेल्या महिलांनी नगरसेवक राज वानखेडे यांच्याकडे केली. त्यानुसार वानखेडे यांनी मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कल्पना दिली व स्वत: पाहणी करण्यास गेले. मध्यवर्ती कारागृहाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या मोठय़ा टाकीतून सुमारे अडीचशे लोकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे. नियमित बिल भरणाऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संबंधित लोक चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यातूनच गुरुवारी रात्री कोणी तरी प्लास्टिकच्या नळांचे असलेले हे कनेक्शन जाळून टाकले. मात्र, या प्रकाराची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गंधवार्ताही नव्हती. शुक्रवारी दुपारी पाणी सोडण्यात आले, त्यावेळी या वाहिनीतून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून गेले. सगळीकडे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. नगरसेवक वानखेडे तेथे गेले, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी हा पाणीपुरवठा बंद करण्यास संबंधित कर्मचाऱ्यास सांगितले. मात्र, त्याच वेळी तेथे नगरसेविका ज्योती वाघमारे यांचे समर्थक आले. वाघमारे यांचे पती रुपचंद वाघमारे, त्यांचा भाऊ व अन्य समर्थक तेथे मोठय़ा संख्येने जमले. हे नळ कनेक्शन नियमित करून घेतले जात नाही, तोपर्यंत पाणी घेऊ देण्यास त्यांनी विरोध केला. त्यावरून वानखेडे व वाघमारे समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आले. पोलिसांपर्यंत गेले. परंतु सामंजस्याने मिटले. हा सगळा प्रकार घडूनही मनपाचा कोणीही अधिकारी येथे फिरकला नव्हता. मात्र, भरदुपारी पाण्यावरून हातघाईवर आलेल्या या प्रकारामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता.