महापालिकेतर्फे ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशी पार पडणार आहे. या निमित्ताने ‘तारें जमी पे’फेम आमिर खानची पारितोषिक विजेत्यांशी भेट घडणार आहे.
महापालिकेतर्फे २०११-१२ आणि २०१३-१४ मध्ये ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांची नावे महापौर सुनील प्रभू यांनी मंगळवारी जाहीर केली. २०११-१२ मध्ये गट क्रमांक १ मध्ये फुलती वढाईकने प्रथम, श्रृती नांदोसकरने द्वितीय, तर गौरी महाडीकने तृतीय, गट क्रमांक २ मध्ये लक्ष्मीने प्रथम, भाविक पोतदारने द्वितीय, संजना जाधवने तृतीय, तर गट क्रमांक ३ मध्ये कीर्तिकुमार प्रजापतीने प्रथम, सरिफा निजामने द्वितीय, राहुल वाल्मिकीने तृतीय पारितोषिक पटकावले. २०१३-१४ च्या स्पर्धेत गट क्रमांक १ मध्ये दिया पिंगुळकरने प्रथम, रोशनी चौरसियाने द्वितीय, कोमल साबळेने तृतीय, गट क्रमांक २ मध्ये अद्वैत वाडवडेकरने प्रथम, सागर कांबळेने द्वितीय, आदिती अडसूळने तृतीय, तर गट क्रमांक ३ मध्ये चिराग जाधवने प्रथम, मिहीर पाडावेने द्वितीय, रोहीत काजवडकरने तृतीय पारितोषिक पटकावले.  प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख २५ हजार, २० हजार आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकापोटी रोख पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार रामनाथकर, प्रा. वसंत सोनावणी, प्रा. सुरेंद्र जगताप, दिगंबर चिंचकर, मधुकर गजाकोश व गौरी परब यांनी काम पाहिले. यावेळी उपमहापौर मोहन मिठबावकर, सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी उपस्थित होते.विजेत्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे मुंबईतील बॅनर्सवर झळकविण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली.