जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण प्रकल्पांतर्गत शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आधिच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या या थकित वेतनामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे. यावरही कळस म्हणजे, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबिजेची भेट देण्याचे शासनाने आश्वसन दिले होते. परंतु, ही भेट गुढीपाडव्यानंतरही त्यांना मिळाली नाही.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी सीटूप्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने उद्या, ३१ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
जिल्ह्य़ात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस अत्यल्प मानधनावर काम करतात. शिवाय, कुपोषण व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, तसेच स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा समित्यांमध्ये काम करून अंगणवाडी कर्मचारी अतिशय मोलाचे काम करत असूनही जिल्ह्य़ातील काही प्रकल्पांमध्ये त्यांना नियमित मानधन मिळत नाही. याविरोधात अंगणवाडी कर्मचारी संघटनेने अनेक वेळा आंदोलन करून आवाज उठविला. मात्र, निर्ढावलेल्या  प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बुलढाण्यासह काही प्रकल्पांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. शासनाने कबूल केलेली भाऊबिजेची भेट दिवाळीला मिळायला हवी होती. परंतु, ती भेट गुडीपाडवा उलटून गेल्यावरही मिळाली नाही. याशिवाय, पुरक पोषण आहार शिजविण्याची बिलेही अनेक महिन्यांपासून देण्यात आलेली नसून प्रवासभत्ता दोन वषार्ंपासून प्रलंबित आहे. असे असतानाही कर्मचाऱ्यांना मात्र, महिन्यातून किमान चार ते पाच वेळा मुख्यालयी बोलविण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक भरुदडासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांपासून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, त्यावर कुठलीच अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने ३१ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.