सोलापुरात महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे पाडण्याची कारवाई हाती घेत बडय़ा मंडळींना धक्का दिल्याच्या पार्श्र्वभूमीवर सुशील रसिक सभागृहाचे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या पुत्राच्या ‘सोहम प्लाझा’चे बेकायदा बांधकाम पाडण्यास नगरविकास विभागाने स्थगिती दिल्याच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी ‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन केले.
‘आप’चे स्थानिक नेते विद्याधर दोशी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने पालिकेचे सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांच्याशी संबंधित सुशील रसिक सभागृहाचे बांधकाम बेकायदा आढळून आल्याने त्याबाबत पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी खुलासा मागितला होता. मात्र ही कारवाई होऊ नये म्हणून विष्णुपंत कोठे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे धाव घेऊन स्थगिती मिळविली. यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांचे सुपुत्र संजय शेळके यांनी विजापूर रस्त्यावर उभारलेले ‘सोहम प्लाझा’ इमारतीचे बांधकामही बेकायदा असल्याने त्याविरोधात पालिका आयुक्तांनी नोटीस बजावली असता त्यावरही मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळाला आहे.
केवळ राजकीय वजन वापरून बेकायदा बांधकामे पाडण्यास अडथळा आणला गेल्याच्या पाश्र्वभूमीवर दस्तुरखुद्द महापौर अलका राठोड यांच्याही खासगी निवासस्थानाचे बांधकाम बेकायदा असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. यासंदर्भात आयुक्त गुडेवार यांनी सहायक अभियंता डॉ. पंकज जावळे, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे व अभियंता दीपक भादुले यांची त्रिसदस्यीय चौकशी नियुक्त केली आहे. महापौरांचेच हे बेकायदा बांधकाम पाडून टाकण्याची शक्यता वर्तविली जात असताना या कारवाईच्या विरोधातही नगरविकास खात्याकडून स्थगिती आणली जाऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर आम आदमी पार्टीच्या सोलापूर शाखेतर्फे महापालिका आवारात आंदोलन करण्यात आले. यात विद्याधर दोशी यांच्यासह चंदूभाई देढिया, रुद्रप्पा बिराजदार, मकरंद चनमल, विलास शहा, अॅड. रामभाऊ रिसबूड आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. दरम्यान, या प्रश्नावर शासनाने कारवाई टाळल्यास आम आदमी पार्टीला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दोशी यांनी दिला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांनाही निवेदन पाठवून त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
बेकायदा बांधकाम पाडण्यास स्थगिती दिल्याच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन
सुशील रसिक सभागृहाचे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या पुत्राच्या ‘सोहम प्लाझा’चे बेकायदा बांधकाम पाडण्यास नगरविकास विभागाने स्थगिती दिल्याच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी ‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन केले.
First published on: 07-02-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: App movement against construction of the illegal stay