धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी ‘पाणी बचाव’ मोहीम सुरू केली आहे. शहरात नवेगाव खैरी बांधाचा कालवा फुटल्याने आधीच पाणीटंचाई असताना महापौरांसह आयुक्तांनी कमीतकमी पाण्याचा वापर करून शक्यतोवर वनस्पतींपासून तयार केलेले रंग लावून होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर शहरात दरवर्षी होळीच्या निमित्ताने लाखो लीटर पाणी उधळले जाते. पिचकाऱ्यांमधून रंगीत पाणी आणि पाण्याचे फुगे फोडून पाण्याची वारेमाप नासाडी केली जाते. राज्यातील काही भागासह नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा बांधापासून २३ कि.मी. अंतरावर फुटल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सुमारे ७० टक्के भागात आधीच काही दिवस पाण्याची टंचाई असताना नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. महापौर प्रवीण दटके यांनीही केवळ रंगांची आणि गुलालाची उधळण करून पाणी बचतीला हातभार लावण्याची हाळी दिली आहे. होळी पाण्यातून रंग उधळून खेळण्याचे दिवस आता संपले आहेत. कारण, पाणीसाठे झपाटय़ाने कमी होऊ लागले आहेत. मनुष्याला आणि वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धुलिवंदनाला पाणी जपून वापरा, असे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी केले आहे.
होळीचा सण हा पाण्याचा सण नसून रंगांचा सण आहे, याचे भान नागपूरकर राखतील, अशी अपेक्षाा महापालिका आयुक्त श्रावण हडीकर आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2015 रोजी प्रकाशित
धुळवडीला पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन
धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी ‘पाणी बचाव’ मोहीम सुरू केली आहे.

First published on: 06-03-2015 at 02:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to avoid devastation of water in holi