पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावच्या हद्दीत मोटार कारवर दरोडा घालून अडीच लाखांची रोकड लुटून नेणा-या सात संशयित दरोडेखोरांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात कारमधील दोघे व्यापारी जबर जखमी झाले.
सतीश सूरजमल जाजू (वय ३७, रा. नवसमता सोसायटी, शेळगी, सोलापूर) व त्यांचे सहकारी अमित मनमोहन सोनी (रा. सोलापूर) अशी या दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा व्यापा-यांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून सात संशयित दरोडेखोरांना जेरबंद केले. शंकर गंगाधर वंजारी, आकाश महादेव माने, जमीर रफिक तांबोळी, त्याचा भाऊ जहीर तांबोळी, नीलेश राजेंद्र परचंडे, सोन्या ऊर्फ िपटू अमित दशरथ माने व अनिल ऊर्फ िपटू सुरेश मुळे (सर्व रा. पंढरपूर) अशी अटक झालेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. या सर्वाना पोलीस कोठडी मिळाली आहे.
सतीश जाजू हे आपले सहकारी अमित सोनी यांच्यासह आपल्या वॅगनार कारमधून पंढरपूरला गेले होते. तांदूळ, शेंगदाणे आदी धान्यमालाची विक्रीची आलेली रक्कम घेऊन ते रात्री उशिरा सोलापूरकडे परत निघाले होते. परंतु वाटेत भटुंबरे गावच्या हद्दीत रेल्वे क्रॉसिंगजवळ तीन मोटारसायकलीवरून आलेल्या दरोडेखोरांनी सतीश जाजू यांची कार धडक मारून थांबविली तेव्हा दरोडेखोरांनी जाजू व सोनी यांना शिवीगाळ व मारहाण करीत त्यांच्यावर काठी, दगड व कोयत्याने हल्ला केला. यात ते दोघे जबर जखमी झाले. नंतर दरोडेखोरांनी कारमध्ये ठेवलेली २ लाख ५२ हजारांची रोकड बळजबरीने पळवून नेली. जाजू यांनी यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सर्व संशयित दरोडेखोरांना पकडले. मात्र त्यांच्याकडून लुटण्यात आलेली रक्कम पोलिसांच्या हाती लागली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.