समाजाला समृद्ध करणाऱ्या लोककलांच्या नशिबी समाजाकडून कायम गावकुसाबाहेरचं जगणं आल्याबद्दल ज्येष्ठ गायक, संगीतकार अशोक हांडे यांनी रविवारी डोंबिवलीत एका कार्यक्रमात बोलताना खंत व्यक्त केली. ‘मराठी बाणा’तील लोककलेच्या श्रीमंती थाटाबद्दल अनेकांनी नाके मुरडली असली तरी मुळातच इतर कोणत्याही संगीत प्रकारापेक्षा लोककला श्रीमंत आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
मेहता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कैलासभाई मेहता व पुष्पलता मेहता यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कारांचे रविवारी डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थांच्या वक्रतुंड सभागृहात अशोक हांडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यंदा हा सन्मान लोककलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवेक व सुस्मिता ताह्मणकर या दाम्पत्याला देण्यात आला, तर पत्रकार विशेष पुरस्कार अजित मांढरे यांना प्रदान करण्यात आला.  
एखाद्या विद्वानास पुरस्कार दिल्यानंतर तो आपण कसे विद्वान आहोत याचेच कथन करत बसला असता. मात्र लोककलाकारांना मिळालेल्या पुरस्कारानंतर विद्यार्थी आहेत म्हणून आम्ही आहोत, असा सूर असतो. ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई’ ही भावना फक्त लोककलावंतांच्या कार्यक्रमात पाहायला मिळेल. मात्र त्यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली आहे. वाघ्यामुरळी असोत वा अंबाबाईचे जोगते त्यांना केवळ मदतीची आश्वासनेच मिळाली. शिवाजी महाराजांनी या कलेचा वापर स्वराज्याच्या उभारणीसाठी करून घेतला. लोकप्रबोधन हा लोककलेचा आत्मा आहे म्हणूनच त्या काळचा समाज अतिशय समंजस, एकमेकांना मदत करणारा होता, असेही हांडे म्हणाले.