शहराच्या क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान देणारे माजी महापौर  व लोकमंचचे नेते अटलबहादूर सिंग यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातील क्रीडा संघटकांच्या तुलनेत अजून  तरुण असतानाही शासनाने दिलेला जीवन गौरव पुरस्कार एकप्रकारे अनपेक्षित भेट असल्याची प्रतिक्रिया अटलबहादूर सिंग यांनी व्यक्त केली.
शहराच्या क्रीडाक्षेत्राला ओळख मिळवून देण्यात अटलबहादूर सिंग यांचे योगदान मोठे आहे. राजकारणी म्हणून एकदा उपमहापौर आणि दोनदा महापौरपद त्यांनी भूषविले आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. महापालिकेत किंग मेकर अशीच त्यांची ओळख आहे. महापौर असताना त्यांनी फुटबॉल, व्हॉलिबॉल कबड्डीसह विविध खेळांच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकाराने महापालिकेने अखिल भारतीय गोल्डकप फुटबॉल स्पर्धा सुरू केली. शहरातील अनेक क्रीडा मैदानांचा त्यांच्या कार्यकाळात विकास झाला. नागपूर विद्यापीठावर १७ वर्षे कारिकारिणी सदस्य आणि २३ वर्षे सिनेट सदस्य राहिले. देशाला चांगले फुटबॉलपटू देणाऱ्या नागपूर शहरात फुटबॉलची कोणतीही संघटना नव्हती, अशा परिस्थितीत अटलबहादूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्य़ात फुटबॉल संघटना अस्तित्वात आली. गेल्या ३५ वर्षांंपासून ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. खेळ आणि खेळाडूंना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे.
अटलबहादूर सिंग यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले, हा पुरस्कार नागपूरकरांचा आहे. या शहराने मला मोठे केले असल्यामुळेही हा पुरस्कार शहराचा आहे. आयुष्यभर क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम केले. या हाताने शेकडो पुरस्कार वाटले आणि अनेकांचे सत्कार केले, परंतु त्यांचा कधी हिशेब ठेवला नाही. नागपुरातील जनतेने काम करण्याची संधी दिली, त्याचे हे फळ आहे. राज्य शासनाने या पुरस्कारासाठी एका सरदाराची निवड केली याहून मोठा गौरव होऊ शकत नाही, असे सांगून या पुरस्काराने भारावलो असल्याचे ते म्हणाले. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि तरुण भारतचे क्रीडा पत्रकार संजय लोखंडे यांना राज्य क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर झाला आहे. शहरातील एकूण आठ जणांना पुरस्कार जाहीर झाले असून नागपुरातील क्रीडाक्षेत्राचा हा बहुमान आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून त्यात आटय़ापाटय़ा खेळात नागपूरच्या भूषण गोमासे आणि आलोक पांडे यांचा समावेश आहे.