केरोसीनचा काळाबाजार केल्याच्या आरोपावरून आरसीएफ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पवन अग्रवाल असे या आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पवन अग्रवाल चेंबूर परिसरात राहतो. मात्र तो रॉकेल तसेच धान्याचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी रविवारी आरसीएफ पोलिसांनी वाशीनाका परिसरात सापळा लावला होता. पोलिसांना बघताच त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस शिपाई सुनील बिचकुले याने आरोपीला शिताफीने पकडण्यात यश मिळवले. अग्रवाल याला सरकारी कामात अडथळा तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि अन्न भेसळ प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अटक केल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी दिली. यापूर्वीही अग्रवाल याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरीविरोधी पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्य़ाअंतर्गत अटक केली होती, अशी माहिती आरसीएफ पोलिसांनी दिली.