नगरच्या स्थानिक उद्योजकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करणा-या, सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या‘अहमदनगर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अहमदनगर ऑटो अँड इंजिनिअरिंग असोसिएशन कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे अशी माहिती कंपनीच्या संचालक मंडळाने पत्रकारांना दिली.
क्लस्टरच्या नियोजित इमारतीचे काम येत्या महिन्यात सुरू केले जाणार आहे व दीड वर्षांत पूर्ण सुविधांनी ते कार्यान्वित होईल, अशी माहिती कंपनीचे संचालक अजित घैसास, कारभारी भिंगारे व शशांक कुलकर्णी यांनी दिली. या वेळी संचालक मिलिंद कुलकर्णी, अविनाश बोपोर्डीकर व व्यवस्थापिका वैशाली माळवदे आदी उपस्थित होते.
क्लस्टरसाठी केंद्र सरकार साडेनऊ कोटी, राज्य सरकार दीड कोटी रु. देणार आहे तर कंपनीचे सभासद असलेले उद्योजक ४ कोटी रुपये उभे करणार आहेत. क्लस्टरसाठी एमआयडीसीत २ एकरचा भूखंडही मिळाला आहे. सध्या कंपनीचे १०२ उद्योजक सभासद झाले आहेत. क्लस्टरमार्फत आंतराराष्ट्रीय दर्जाच्या टेस्टिंग, एन्स्पेक्शन, टुल रूम, ट्रेनिंग, सँपल मॅन्युफॅक्चरिंग, सरकारच्या विविध योजनांची माहिती, अपग्रेडेशनसाठी कन्सल्टन्सी आदी सुविध दिल्या जाणार आहेत. अनेक उद्योजकांना स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण चाचण्यांची आवश्यकता असते, त्याही उपलब्ध केल्या जाणार आहेत. ऑर्डर मिळण्यापूर्वी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य होत नसते, अशावेळी क्लस्टर उपयोगी पडणार आहे. क्लस्टरची नियोजित इमारत ३० हजार चौ. फुटांची असेल, त्यात या सुविधांसह लायब्ररी, हॉल, प्रशिक्षण केंद्र याचा समावेश आहे.
सध्या क्लस्टरच्या माध्यमातून ‘आयएलओ’च्या सहकार्याने लिन मॅनेजमेंट ट्रेनिंग कार्यक्रम राबवला जात आहे, त्याचा लाभ ५० उद्योजकांनी घेतला आहे. नगर व ७० किलोमीटरच्या परिघातील उद्योजक क्लस्टरचे सभासदत्व मिळवू शकतात. क्लस्टरमुळे एमआयडीसीच्या व नगर शहराच्या अर्थकारणात मोलाचे योगदान देईल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला.
क्लस्टरचे फायदे
– दीड वर्षांनंतर रोजगारात किमान दीडपट वाढ
– सभासद उद्योजकांना सवलतीच्या दरात सेवासुविधा
– निर्यात वाढेल
– कामगारांना आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रशिक्षण
– गुणवत्ता चाचण्यांसाठी उद्योजकांना इतर ठिकाणी जावे लागणार नाही
– कंपनीचा नफा क्लस्टरच्या विकासासाठीच वापरणार
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
ऑटो क्लस्टरला केंद्राची मंजुरी
नगरच्या स्थानिक उद्योजकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करणाऱ्या, सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या ‘अहमदनगर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

First published on: 10-07-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto cluster sanctioned by central govt